शिक्षक संघटना एकवटल्या : विविध मागण्यांचे निवेदन सादरवर्धा : शिक्षकांच्या विविध मागण्यांकरिता व शिक्षणाधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा निषेध नोंदविण्याकरिता शनिवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर शिक्षकांच्या विविध संघटनांनी धडक दिली. यात विविध आरोप करीत कारवाई करण्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केले. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवदेनात माध्यमिक शाळा संहिता, महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या) शर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियमावली २०११ मधील तरतुदींना डावलल्याचा आरोप आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता सन २०१३ - १४ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विद्यमान संच मान्यता पद्धती सुरू ठेवण्याच्या मागणीकरिता आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सन २०१३-१४ या वर्षाच्या संच मान्यतेचे प्रपत्र तब्बल एक वर्षानंतर राज्यभरातील शाळांना वितरीत करण्यात आले आहे. संच मान्यता सर्व कायदे नियमांना तडा देणारी आहे. यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात असंतोष व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या सामूहिक असंतोषामुळे शैक्षणिक कार्यावर विपरीत परिणामाचा आरोप आहे.नव्याने जाहीर करण्यात आलेला संच निकषांवर आधारीत नसल्याचा आरोप करीत या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी सहभाग नोंदविला होता. (प्रतिनिधी)
शिक्षकांची जि.प.वर धडक
By admin | Updated: September 7, 2014 00:02 IST