मागणी : सामाजिक कार्यकर्त्यांचे नगर पालिकेला निवेदनहिंगणघाट : सध्या वातावरणाच्या बदलामुळे व वेळी अवेळी येत असलेल्या पावसामुळे डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या रोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात सर्वत्र असलेल्या अस्वच्छतेमुळे या आजाराचा फैलाव होत असल्याने स्वच्छता मोहीम राबवून हा फैलाव थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे नगर परिषद मुख्याधिकारी यांना करण्यात आली. स्स्ध्या हिंगणघाट शहरामध्ये ठिकठिकाणी केर कचरा साचुन आहे. पावसामुळे या कचऱ्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच हिंगणघाट शहरामध्ये शितला माता परिसर, काळी सडक परिसर, हनुमान वार्डातील व गावातील अन्य भागात डेंग्यु आणि मलेरियाचे रूग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असून नगर पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सांडपाण्याचे नियोजन नाही, याकडे तातडीने लक्ष घालून हिंगणघाट शहरातील साफ सफाईचे नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली. नुकतेच टिळक वॉर्डातील अंजली काटोले (९) आणि हनुमान वॉर्डातील व नितीन वरूळकर (१) यांना डेंग्युची लागण झाल्याचे आढळले. दिवसेंदिवस डेंग्युचे आणि मलेरियाचे रूग्ण निदर्शनास येत आहे. याकडे नगर पालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे व रोगांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शिष्टमंडळात रुपेश लाजूरकर, सचिन मोरे, गोपाल जोडाजडे, मंगेश मुसळे, मारोती माहकर, उमेश नागोसे, विजय मस्के, सोनू भांगे, रुकेश डांगरे, नंदु काळे, विशाल हुलके, रोशन झाडे, नितीने भांगे यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)
डेंग्यू व मलेरियाचा होणारा फैलाव थांबवा
By admin | Updated: September 7, 2014 00:05 IST