लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : दरवर्षी दसऱ्याला पांढरे सोने शेतकऱ्यांच्या घरात येते. यावर्षी पहिल्यांदा सतत एक महिना त्यानंतर २८ आॅक्टोबर व अगोदर झालेल्या परतीच्या पावसाने कपाशी पीक धोक्यात येऊन पिवळे पडले. त्यात ढगाळ वातावरणाने पावसाची बोंडे फुटली नाही. परिणामी, दिवाळी होऊनही कापसाची आवक अद्याप शेतकऱ्यांच्या घरात सुरू झालेली नाही. परतीच्या पावसाने कपाशी उत्पन्न लांबणीवर गेल्याने शेतकरी नैराश्याच्या खाईत लोटला गेला आहे. मात्र, त्याची ही अवस्था कोण समजून घेणार, हा प्रश्न आहे.आर्वी तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस, त्यानंतर ढगाळ वातावरण त्यामुळे कपाशी पिकाला दिवसाला १० ते १२ तासांच्या सूर्यप्रकाशाची गरज असताना शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली.तालुक्यात कपाशीची २३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी असून तालुका कॉटनचा हुकमी पट्टा म्हणून ओळखला जातो. जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक पिवळे पडून बोंडे सडली. अतिपावसाने कपाशीला बुरशीची लागण झाल्याने दरवर्षी दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कपाशीची गंजी व आवक .दिसायची ती यावर्षी दिवाळीनंतर १० दिवस उलटूनही दिसत नाही. महागड्या फवारण्या, खते, सततच्या पावसाने वाढलेले तण यामुळे यावर्षी कपाशी पिकाचा खर्च दुप्पट झाला आहे. दिवाळी उलटूनही कापूस घरात येत नसल्याने झालेला खर्च तरी निघणार का? या विवंचनेत शेतकरी आहेत.दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.शासनाने नुकसानभरपाऊ देण्याबाबत आदेश काढले. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सोयाबीनपाठोपाठ कापूस उत्पादक शेतकरीही यावर्षी संकटात सापडला आहे. अनेक भागात नोव्हेंबर महिना उजाडूनही वेचणीला सुरुवात झाली नाही. लावलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी निराश आहेत. शासनाने तातडीने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.माझ्याकडे ४ एकर कापूस लागवड आहे. परंतु अद्यापही शितादहीशिवाय कापूस वेचणीला सुरुवात झाली नाही. दरवर्षी दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरात भरून राहतो. मात्र यावर्षी सततच्या पावसाने कापसाची आवक मंदावली, झालेला खर्चही निघणार नाही. नुकसानीची पाहणी करण्यासाठी अद्याप कुणीही आले नाही.- भाष्कर चौकोने, कापूस उत्पादक शेतकरी, दहेगाव (मुस्तफा), ता. आर्वी.
परतीच्या पावसाने कपाशीचे उत्पन्न लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST
दरवर्षी शेतकऱ्यांचा दिवाळीत १५ ते २० क्विंटल कापूस घरी येतो. परंतु यावर्षी मात्र शितदहीपलीकडे अद्याप कापसाचा वेचा सुरू झाला नाही. परतीच्या पाऊस, ढगाळ वातावरण, रोगराई याचा थेट परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागदरा, शिरपूर, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, दहेगाव, पाचेगाव, खुबगाव, लाडेगाव, देऊरवाड्यासह तालुक्यातील ७० गावांतील शेतशिवारात ही परिस्थिती आहे.
परतीच्या पावसाने कपाशीचे उत्पन्न लांबणीवर
ठळक मुद्देशेतकऱ्यांची व्यथा कोण समजणार? : शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी