कृषी विभाग व विज्ञान केंद्राचा उपक्रम : बरबडी, पवनार, धामणगाव, खानापूर शिवारातील पिकांचा सर्वेवर्धा : सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांची स्थिती समाधानकारक नसल्याची ओरड होत आहे. शिवाय अनेक रोगांनी आक्रमण केल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांच्याद्वारे पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. चर्चासत्रांतर्गातील या उपक्रमात वर्धा तालुक्यातील बरबडी, पवनार, धामणगाव, खानापूर आदी गावांतील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला तसेच मोसंबी, सिताफळ आदी पिकांची पाहणी केली गेली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भारती, कृषी विज्ञान केंद्र सेलसुराचे किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे, जि.प. कृषी विकास अधिकारी संजय खळीकर, सर्व उपविभागीय कृृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. या सर्वेक्षणात पिकांवर आढळून आलेल्या कीड व रोगाच्या प्रादुर्भावावर उपाययोजना सुचविण्यात आल्या. शिवाय सविस्तर चर्चाही करण्यात आली. शेतकऱ्यांनी या उपाययोजना करून पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)सोयाबीन, कपाशी, तूर पिकांसह भाजीपाला व फळबागांवर करावयाच्या उपाययोजनाकापूस - सर्वेक्षणामध्ये कपाशीवर हिरवी बोंड अळी तसेच रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या व पिठ्या ढेकुणचा प्रादुर्भाव दिसून आला. याच्या व्यवस्थापनाकरिता एच.एन.पी.व्ही. १० ते १५ मिली व १ ग्रॅम राणीपाल डायमेथोएट १० मिली व कॉपर आॅक्सिक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यात बोंड अळीचा नायनाट होण्यास मदत होईल. रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनाकरिता फिप्रोनिल ५ एस.सी. ४० मिली वा फिप्रोनिलची भुकटी ०.३ टक्के १० किलो या प्रमाणात हवा शांत असताना शेतात धुरळावी. पिठ्या ढेकुणकरिता १० टक्के दाणेदार फोरेट वा ०.३ टक्के फिप्रोनिल भुकटी रिंग करून १० किलो प्रती हेक्टरी धुरळावी वा झाडाच्या भोवती टाकावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी सोबत आंतरप्रवाही किटकनाशकाची अर्धी मात्रा करून फवारणी केल्यास रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी होते. जैविक किटकनाशकामध्ये व्हर्टिसिलयम लॅकॅनी वा मेटारायझियम अॅनिस्पोली ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वातावरणात ८० ते ९० टक्के आर्द्रता असल्यास जैविक किटकनाशके अधिक परिणामकारक ठरतात.कपाशीवर पॅरॉविल्ट रोग म्हणजे झाड शेंडापासून पूर्णपणे मान टाकून कोमेजलेल्या अवस्थेत दिसून येतात. कॉपर आॅक्सिक्लोराईड वा कार्बेनडाझिम २५ ते ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडाला ड्रेचिंग करावी तसेच कपाशीवर फवारणी करावी, असे सांगितले.तूर - तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही १६ मिली वा मोनाक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ११ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर फुलोरा अवस्था येण्याच्या आधी अॅझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ०.०३ टक्के ५० मिली १० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी १० ते १५ दिवसाच्या नंतर मोनोक्राटोफॉस ३६ टक्के २५ मिली १० लिटर पाण्यामध्ये मिसळून करावी. तिसरी फवारणी डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसाचे नंतर करावी. यामुळे पिसारी पतंग शेंगा पोखरणारी अळी, शेंगेवरील माशी व शेंगेवरील ढेकुण यांचा बंदोबस्त होण्यास मदत होते. पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिकावर थायरम ३० ग्रॅम व खोडावरील करपा दिसून आल्यास रिडोमिल एम झेड २० ग्रॅम वा कार्बेनडाझिम २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे सांगण्यात आले.
पिकांची पाहणी करून सुचविल्या उपाययोजना
By admin | Updated: October 7, 2015 00:57 IST