बांदा : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे कोसळलेली दरड हटविण्यास संततधार पावसाचा अडथळा येत आहे. ही दरड हटविण्याचे काम धिम्यागतीने सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक अद्यापही एकेरी पध्दतीने सुरु असून येत्या दोन दिवसांत दरड पूर्णपणे हटविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे कार्यकारी अभियंता पी. राजरत्नम यांनी सांगितले.तीन दिवसांपूर्वी सटमटवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याबरोबर माती व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने सिमेंटची संरक्षक भिंत देखील कोसळली होती. तीन दिवस उलटले तरीही महामार्ग उपविभागाकडून दरड हटविण्याचे काम धिम्यागतीने सुरु आहे.दरम्यान, बांदा आणि परिसरात गेले चार दिवस संततधार पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात दरड कोसळणे, झाडे कोसळण्याचे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तिघांच्या उमेदवारीचा प्रस्ताव
By admin | Updated: July 16, 2014 01:05 IST