प्रशांत हेलोंडे वर्धा‘इ-गव्हर्नंस’साठी राज्यभरातील ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केला जात आहे़ यासाठी ‘डाटा एन्ट्री आॅपरेटर’ची नियुक्ती करण्यात आली़ या अंतर्गत शेतकऱ्यांना हस्तलिखीताऐवजी आॅनलाईन सातबारा देण्यात येत आहे; पण हे सातबारेच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे़ कर्जमुक्त शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा दाखविला जात असून एकाचे शेत सातबाऱ्यावर दुसऱ्याच्या नावावर दाखविले जात आहे़ हा प्रकार एखाद्या सातबाऱ्यामध्ये नाही तर शेकडो सातबाऱ्यांमध्ये होत असल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे़राज्य शासनाद्वारे सर्व शासकीय रेकॉर्ड आॅनलाईन करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे़ शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी कागदी फाईल्स संगणकात अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहे़ शेतकऱ्यांचा डाटाही आॅनलाईन केला जात आहे़ यात एकच काम पुन्हा-पुन्हा करावे लागू नये म्हणून शासनाने सातबारा आणि आठ अ ही शेतकऱ्यांना लागणारी प्रमाणपत्रे आधीच आॅनलाईन केली आहेत़ यासाठी ई-सेवा केंद्रही स्थापित केले़ शेतकऱ्यांना आॅनलाईन पद्धतीने तयार केलेले सातबारेच दिले जात आहेत़ संगणकावर तयार होणाऱ्या या सातबाऱ्यामध्ये परिचालकांद्वारे अनेक चुका होत असल्याचे निदर्शनास येते. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला आहे़ बँका, सावकार, कृषी केंद्र संचालक यांचे कर्ज अदा करणेही शेतकऱ्यांना अशक्य आहे़ काही शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेत बँका, सोसायट्यांचे कर्ज फेडले; पण सातबारा काढला की त्यात कर्जाची नोंद दिसते़ शेतकऱ्यांवर कर्ज नसताना सातबाऱ्यावर कर्ज नोंद होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ शिवाय कुठल्याही एकाच शासकीय बँक वा सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना कर्ज घेता येते़ ‘नो ड्यू’ प्रमाणपत्राशिवाय शेतकऱ्यांना कर्जच मिळत नाही़ असे असताना एकाच सातबाऱ्यात सोसायटी व बँक, असे दोन्हींचे कर्ज दाखविले आहे़ हा प्रकार अनाकलनीय ठरत आहे़ या प्रकाराकडे लक्ष देत यात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे़वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) येथील शेतकरी ब्रह्मानंद गोविंद वाघमारे या शेतकऱ्याचे सर्व्हे क्ऱ ४३१ मध्ये ०़९७ आर शेतजमीन आहे़ सदर शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही; पण आॅनलाईन सातबाऱ्याने त्यांना कर्जबाजारी केले आहे़ एकाच नव्हे तर दोन वेळचे कर्ज थकित दाखविण्यात आले आहे़ सहकारी सोसायटीचे ५० हजार आणि ९० हजार रुपये थकित असल्याची नोंद केली आहे़ माळेगाव येथील व्यंकटी देवराव वरघणे यांच्या ०़८१ आर शेतीवर ७० हजाराचे बँकेचे तर ४० हजार रुपये सहकारी सोसायटीचे कर्ज नोंदविले आहे़ हस्तलिखीत सातबाऱ्यावर कर्जाची नोंद नाही़पालोती येथील आनंद रमेश खंडागळे यांची सव्हे क्ऱ ५१ मध्ये २़०६ हे़आऱ शेतजमीन असून ती आॅनलाईन सातबाऱ्यामध्ये परमेश्वर कृष्णराव शिंदे यांच्या नावावर दाखविण्यात आली आहे़ अशा प्रकारचा घोळ शेकडो शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यामध्ये करण्यात आले आहे़
आॅनलाईन सातबारा कर्जाचे द्योतक
By admin | Updated: May 7, 2015 01:27 IST