वर्धा : शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळांतील ६०३ मंजूर पदवीधर पदांपैकी रिक्त ४५० पदांवर पदवीधर बीएड शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या़ यात जि़प़ प्रशासनाने सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावलून अनियमितता केल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे़ या प्रकरणी चौकशी करून नियुक्त्या रद्द कराव्या व कारवाई करावी, अशी माणगी सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्रितपणे केली आहे़ याबाबत नागपूर आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले आहे़ पदवीधर शिक्षकांना मिळणारा ४ हजार ३०० ग्रेड पे लक्षात घेता, हे पद उन्नत पद असून सेवेतील लाभाचे पद आहे. यामुळे ही पदस्थापना पदोन्नतीचाचा एक भाग आहे़ यासाठी प्रचलित नियम व उपलब्ध शासन निर्णयानुसार जिल्हा सेवाज्येष्ठता यादीतील क्रमानुसारच ६ जुलै १४ च्या समुदेशनात प्राधान्याने पात्र उमेदवरांना संधी देत पदनियुक्ती करणे जि़प़ प्रशासनाला गरजेचे होते. याबाबत जि.प. शिक्षण विभाग व शिक्षक संघटनांचीही सहमती होती. विशेष म्हणजे, जिल्हा सेवाज्येष्ठता यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती; पण जि़प़ प्रशासनाने सर्व नियम धाब्यवर बसवून जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता डावलून तालुका सेवाज्येष्ठता याद्या तयार केल्या आणि पदनियुक्ती देताना सर्वात सेवाकनिष्ठ असलेल्या शिक्षकास समुपदेशनात प्रथम प्राधान्य देऊन सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय करण्यात आला़ समुपदेशनापूर्वीच १२८ शिक्षकांना त्यांच्याच कार्यरत शाळेत रिक्त असलेल्या पदवीधर शिक्षकाच्यास पदावर परस्पर पदनियुक्ती देऊन आदेश निर्गमित करण्यात आले़ सर्वांना समान संधी, समान न्याय दिला नाही. समुपदेशनामध्ये शासन निर्णयातील अ ते फ नुसार प्राधान्यक्रमही देण्यात आला नाही. त्यामुळे अपंग, विधवा, पती-पत्नीवर अन्याय झाला. याबाबत ३ जुलै रोजी शिक्षकांच्यावतीने सर्व संघटनाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले़ यात जिल्हा सेवाज्येष्ठता धरून समुपदेशन करण्यात यावे, अशी विनंती केली; पण यास नकार देण्यात आला़ शेवटी ६ जुलै रोजी सेवेत कनिष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देऊन समुपदेशन करण्यात आले़ यामुळे जिल्ह्यातील पात्र सेवाज्येष्ठ पदविप्राप्त शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे़ शिक्षकांच्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन नियमबाह्यपणे करण्यात आलेल्या पदवीधर शिक्षकाच्या पदस्थापना त्वरित रद्द कराव्या, अशी मागणी केली आहे़ अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व प्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे़ यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे नरेश गेडे, महेंद्र भुते, प्राथमिक शिक्षक संघाचे लोमेश वऱ्हाडे, वसंत बोडखे, शिक्षक सेनेचे वासुदेव डायगव्हाणे, प्राथमिक शिक्षक परिषदेचे वसंत खोडे, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सतीश बजाईत, अ़भा़ प्राथमिक शिक्षक संघाचे शंकर फरकाडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राजू थूल, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सतीश जगताप व प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे अरुणकुमार हर्षबोधी आदी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)
पदनियुक्तीमध्ये सेवाज्येष्ठतेला बगल
By admin | Updated: July 10, 2014 23:45 IST