सत्यनारायणा : बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद, २५२ शोधनिबंध सादरवर्धा : तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात असिमित झेप घेतल्याने सर्व क्षेत्रांचा कायापालट होत आहे. हे नवे बदल, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्राला बळ देणारे असून संशोधनाची, नाविण्यतेची ऊर्जा निर्मिती करणारे ठरेल, असे विचार मुंबई येथील टाटा इन्स्टिट्युट आॅफ फन्डामेंटल रिसर्चच्या हाय एनर्जी फिजिक्स विभागाचे सायंटिफिक आॅफिसर डॉ. सत्यनारायणा यांनी व्यक्त केले.बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वॉलिटी अपग्रेडेशन इन इंजिनिअरिंग, सायन्स अॅन्ड टैक्नॉलॉजी विषयावर आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विचारपुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे बी.सी.यु.डी. चे संचालक डॉ. डी.के. अग्रवाल, प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे संयोजक डॉ. एम.डी. चौधरी, आय.सी. क्वेस्टचे समन्वयक डॉ. नितिकेत म्हाला, सहसंयोजक प्रा. एम.एन. ठाकरे, आयोजन सचिव प्रा. मनोज सायंकार यांची उपस्थिती होती.‘प्रोबिंग द फ्रन्टायर आॅफ सायन्स युजिंग अॅडव्हासिंग टेक्नॉलॉजिक्स अॅन्ड इजिनिअरिंग टुल्स’ या विषयावर बीजभाषण करताना डॉ. सत्यनारायणा म्हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रात उदयास येणारे तंत्रज्ञान विकसित राष्ट्राकडे वाटचाल करणारे आहे. यात सातत्याने होणारे बदल, नाविन्यपूर्ण कल्पना, विज्ञान व तंत्रज्ञानाला नवी दिशा देणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभियांत्रिकी शाखेत नाविन्यता निर्माण झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. अग्रवाल यांनी सद्यस्थित असलेली संशोधनाची पद्धत विशद केली. संशोधनाची गरज, उपयोगिता याविषयी त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. संशोधनात जे बदल होत आहे त्याचा पुरेपूर उपयोग देशाच्या व समाजाच्या प्रगतीकरिता करता येईल, असे सांगत अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची सातत्याने आवश्यकता असल्याचेही सांगितले. डॉ. चौधरी यांनी शासनाच्या धोरणामध्ये सुधारणा करून संशोधन, मूलभूत सुविधा व तांत्रिक कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधनात संवाद असण्याची गरज असल्याचे सांगत उत्तम संशोधन साकार करण्याकरिता सार्वत्रिक प्रयत्नाची आवश्यकता बोलून दाखविली. समन्वयक डॉ. म्हाला यांनी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजनामागील भूमिका विशद केली. परिषदेत संपूर्ण देशभरातून ३७० शोधनिबंध प्राप्त झाले होते. यामधून २५२ शोधनिबंध निवडण्यात आले. संचालन प्रा. एम.एस. निंबार्ते व प्रा. एम.आर. सायंकार यांनी केले. आभार प्रा. ठाकरे यांनी व्यक्त केले. परिषदेला प्राध्यापक, संशोधनकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
अभियांत्रिकीतील नवे बदल संशोधनाला ऊर्जा देणारे
By admin | Updated: April 23, 2016 02:10 IST