श्रेया केने - वर्धापर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना समाजमनात शतप्रतिशत प्रमाणात रूजविण्याचे ध्येय आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय तर ते शक्यच नाही. बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरुपही पालटत आहे; मात्र ते बिभत्सतेकडे झुकणारे असून यामुळे सामाजिक आरोग्यही धोक्यात आले आहे. हे बदलायचे असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. कोणतीही सामाजिक चळवळ उभारायची असल्यास त्याला ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे’ ही उक्ती लागू पडते, असे मत गजेंद्र सुरकार यांनी चर्चे दरम्यान व्यक्त केले.सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेश उत्सव हा उपक्रम जिल्ह्यात सर्वप्रथम राबविणारे कार्यवाहक गजेंद्र सुरकार यांच्यासोबत ‘लोकमत’ ने संवाद साधला. यावेळी त्यांनी या उपक्रमाची सुरुवात, यश आणि व्याप्ती यावर चर्चेदरम्यान प्रकाश टाकला.सामाजिक चळवळीतील सहभागाची सुरुवात कशी झाली याची माहिती देताना ते म्हणाले, १९९८-९९ दरम्यान खगोलशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ अनिल सदगोपालन यांनी भारतीय जनविज्ञान जत्था ही मोहीम राबविली. यात जिल्हा कार्यवाहक म्हणून माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली. पूढे अंनिसच्या माध्यमातून सामाजिक जागृती चळवळीत सक्रीय झालो. सर्वप्रथम संविधान महोत्सव हा उपक्रम जिल्ह्यात राबवून नागरिकांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी याचे भान ठेवणे राष्ट्राच्या प्रगतीकरिता किती आवश्यक आहे, हे पटवून दिले. शिवाय विज्ञान दिनानिमित्त सुडो सायन्स या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. सर्पविज्ञान, होळीचा उपक्रम, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार या माध्यमातून सदैव सामाजिक व जागृतीपर मोहीम सक्रीय पद्धतीने राबविल्या आहे.उत्सव हा पर्यावरणपूरक असला पाहिजे याकरिता आग्रही आहोत. याला सकारात्मक आणि नकारात्मक असे प्रतिसाद आहेत. मात्र यातही हार न मानता आजवर आम्ही विविध कार्यक्रम, परिपत्रक आणि उपक्रमाच्या माध्यमातून जागृती सुरू ठेवली आहे. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने हा उपक्रम यशस्वी होत आहे. धर्मसंकेताचे पालन करताना प्रत्येकाने आपल्या पर्यावरणाला बाधा पोहचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पीओपी मूर्तींचे जलस्त्रोतात विसर्जन केल्याने त्यातील रासायनिक पदार्थाने जलप्रदुषण होते. त्यातील अविघटनशील पदार्थामुळे दुर्धर आजार बळावण्याचा धोका जनतेपर्यंत पोहचवायचा आहे.
इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी कृतीची गरज
By admin | Updated: September 7, 2014 00:05 IST