संकलन संस्था बंद : दूध उत्पादकांची खासगी संस्थेला विक्रीप्रभाकर गायकवाड - पिंपळखुटाएकेकाळी परिसरातील शेतकरी व गोपालकांना वरदान ठरलेली दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. दूध संकलन बंद असून केवळ डेअरीच्या जुन्या स्मृती शिल्लक राहिल्याचे दिसते़आर्वी तालुका दूध व तुप उत्पादक सहकारी संस्थांच्या सौजन्याने पिंपळखुटा येथे स्व. नारायण वाघ यांच्या प्रयत्नाने दूध डेअरी प्रकल्प उभारण्यात आला होता. या निमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावात सहकारी दूध संकलन संस्था स्थापण्यात आल्या़ गावोगावी दुधाचे संकलन सुरू झाले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय समोर आला. पिंपळखुटा येथे दर बुधवारी लोण्याचा बाजार भरत होता. यामुळे जिल्ह्याच्या भौगोलिक नकाशात या परिसराला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. डेअरीमुळे परिसर व तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला होता. यामुळे डेअरीच्या आवारात कर्मचारी वसाहतही निर्माण करण्यात आली होती. दुधाची प्रत ३-४ दिवस चांगली राहावी म्हणून डेअरीत शीतयंत्र व बर्फ कारखाना सुरू करण्यात आला होता़ सध्या बर्फ कारखाना व वसाहत पूर्णत: मोडकळीस आली आहे. १९९० नंतर वर्धा जिल्हा दूध संघाची स्थापना झाली़ या संघामार्फत येथील डेअरीचे नियोजन करण्यात आले; पण सहकारी दूध खरेदीला खासगी दूध खरेदीने आव्हान दिले. खासगी खरेदीदाराने दुधाचे भाव वाढवून दिले़ हे भाव संघाच्या डेअरीला देणे शक्य झाले नाही. यामुळे दुध उत्पादक खासगी खरेदीदारास दूध विकू लागले. एकेकाळी होणारी २५ हजार लीटर दुधाची खरेदी आज अगदी शुन्यावर आली आहे. यामुळे सध्या ही डेअरी कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. ४ वर्षांपूर्वी ही डेअरी मुंबईच्या द्वारका समूहाने कंत्राटावर चालविण्यास घेतली होती. त्यावेळी ४० कर्मचाऱ्यांची वाताहत झाली होती. या समूहाने दोन वर्षे डेअरी कशीबशी चालविली; पण खासगी खरेदीदाराने द्वारका समूहालाही कडवे आव्हान दिले. यामुळे या समूहालाही मुंबईला परतावे लागले. २०१२ मध्ये पुन्हा एका युवकाने पिंपळखुटा डेअरीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. बर्फ कारखाना, शीतगृह, बाजुची रंगरंगोटी आदीमुळे शेतकरी व गोपालकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दुधाची खरेदीही सुरू झाली; पण अचानक याही संस्थेला राजकीय ग्रहण लागले व नावारूपास आलेली साठे डेअरीही बंद पडली़ यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. आज सर्व कर्मचारी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात़ सध्या पिंपळखुटा दूध प्रकल्पाच्या केवळ स्मृती शिल्लक आहेत़ यामुळे गावोगावी असलेल्या सहकारी दूध संस्थाही बंद पडल्या आहेत़ या दूध डेअरी व संकलन संस्थांना पुनरूज्जीवित करणे गरजेचे झाले आहे़
दूध डेअरी इतिहासजमा होणार!
By admin | Updated: October 27, 2014 22:42 IST