वर्धा : काही समाजकंटकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या फलकाची विटंबना केली. हा प्रकार लक्षात येताच हिंगणघाट येथील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता समाजकंटकांनी कार्यकर्त्यांना शस्त्रांचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ याबाबत लहुजी जनशक्ती सेनेच्याद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना निवेदन सादर करण्यात आले़हिंगणघाट येथे घडलेला प्रकार निंदनीय आहे़ या प्रकाराविरूद्ध काही समाजबांधव लेखी तक्रार करण्यास गेले असता कार्यरत गृहखात्याने योग्य दखल न घेता त्यांच्यावर लाठीमार केला. दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातून तसेच नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती येथून आलेल्या प्रमुख मान्यवरांसह पोलीस ठाण्याच्या परिसरात एकत्र येत असलेल्या समाजाच्या नागरिकांना लाठीचार्ज करण्याची धमकी देत हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला़ तालुक्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध लाठीचार्ज केला जात नाही; पण शांततेने निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या या गरीब समाजावर लाठीचार्ज केला जातो. हा सर्व प्रकार लक्षात घेत कार्यरत पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी आणि मातंग समाजातील कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेल्या कलमा खारीज कराव्या, संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करून गरिब मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही लहुजी शक्ती सेनेच्यावतीने करण्यात आली़ याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़ शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संग्राम कळणे, शंकर पोटफोडे, शक्ती नाडे, अमोल गवळी, विजय वानखेडे, रूपेश वानखेडे, जीवन गवळी, सागर मुंगले, जय मुंगले, विशाल मुंगले, विठ्ठल पडघान, रंजीत धोंगडे, सूरज कांबळे, नितेश मुंगले, शेखर धोंगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)
लहुजी जनशक्ती सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By admin | Updated: August 5, 2014 23:51 IST