वर्धा : दुबार-तिबार पेरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला आता हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदा एकामागून एक अस्मानी संकट बळीराजाचा पाठलाग करीत याचा सामना करून कसेबसे पीक वाचविले. यातून किमान मशागतीचा खर्च निघेल अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र आता कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सेलु तालुक्यातील तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी शासनानकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. पिकावर लाल्याने आक्रमण केल्याने, उभे पीक वाळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे. एकीकडे कर्जाचा वाढता डोंगर आणि उत्पन्नाची हमी शून्य अशा विदारक स्थितीचा सामना करण्याकरिता शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे ठरत आहे. येथील तुळजापूर(वघाळा), टाकळी(किटे), जयपूर, तळोदी, कुटकी, सेलू (स्टेशन) परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागातील कपाशीचे पीक लाल्याच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे पिके वाळत आहे. काही शेतात तर संपूर्ण पीक वाळले असून उत्पन्नाची हमी राहिलेली नाही.एकरी सोयाबीनचा उतारा कमीआल्याने शेतकऱ्यांच्या आशा कपाशीवर टिकुन होत्या. यातून यंदाचा लागवड खर्च निघेल अशी अपेक्षा असताना लाल्यामुळे कपाशीचे पिकही हातचे गेले आहे. सोयाबीनचे एकरी दिड-दोन क्विंटल असे अल्प उत्पन्न मिळत असल्याने काहींनी तर कापणी करण्याचे ताळले आहे. कपाशीचे पीक वाळत आहे. तूत पिकाला बहर नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे ओलिताची सुविधा आहे. पण वीज वितरण कपंनीकडून होत असलेल्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे ओलित करणे शक्य होत नआही. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. काही शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. मात्र ऊसाला अल्प भाव असल्याने शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिकांना हमीभाव देण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण
By admin | Updated: November 29, 2014 23:25 IST