ठाणेगाव : जिल्ह्यात उशिरा का होईना पाऊस आला. प्रारंभीचा पाऊस एका दिवसाचा नव्हता, तो सतत असल्याने नुकसान झाले. ठाणेगाव परिसरात या पावसाने अनेक घरांची पडझड झाली. यात शासनाच्यावतीने बांधून देण्यात आलेल्या इंदिरा आवास योजनेतील घरांच्या भिंती कोसळल्याने या वस्तीत राहत असलेल्या दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना उघड्यावर यावे लागले. कोणीही बेघर राहू नये याकरिता शासनाच्यावतीने गरजवंतांकरिता इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली. सिमेंट पक्के बांधकाम असलेल्या या घरांच्या कामात घोळ झाल्याचे या पावसात समोर आले आहे. परिसरात आलेल्या पावसाने अनेक घरांची पडझड झाली. यात इंदिरा आवास योजनेतील घर पडल्याने येथील विधवा, निराधार महिलांना उघड्यावर यावे लागत आहे. त्यांच्या घरांच्या भिंती या सततच्या पावसाने कोसळल्यामुळे नुकसान होऊन ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची पाळी आली.गत आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र वादळासह अतिवृष्टी झाली. सततच्या झालेल्या मुसळधार व वादळी पावसाच्या तडाख्यामुळे उषा महादेव मडके (५५) रा. ठाणेगाव (हेटी) यांच्या राहत्या घराची भिंती कोसळल्या. तसेच तुळसाबाई लक्ष्मण वरठी (६५) रा.ठाणेगाव (हेटी) या म्हातारीच्याही घराची भिंत कोसळली. या महिला मागासवर्गीय जाती, जमातीच्या असून निराधार, विधवा महिला आहेत. मोलमजूरी करून कसेबसे जीवन जगतात. त्यांच्या घरांची पडझड झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात रहावे कुठे? लोकांकडे राहण्याची वेळ आली आहे. या गरजूंवर पावसाळ्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीने ओढवलेल्या संकटात त्यांना आधार देण्याकरिता संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.(वार्ताहर)
इंदिरा आवास योजनेतील घरे पडली
By admin | Updated: August 8, 2014 00:08 IST