घोराड : पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. अशात मघा नक्षत्रात पाऊस बसरला. यामुळे शेतकरऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. यात पहिले मारलेली दडी व नंतर आलेला सततचा पाऊस यामुळे पिकात तणाची वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांना निंदणाचा वाढता खर्च लक्षात घेता आता तणनाशकाच्या फवारणीला वेग आला आहे.एक एकर कपाशी निंदणाचा खर्च सद्यास्थितीत तीन हजार ५०० ते चार हजार रुपये येत आहे. यात निंदण व पुंजाने उचलण्याचा खर्च समाविष्ट आहे; परंतु पाच एकर कपाशी असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना २० हजारांचा खर्च होतो. या अगोदर केलेल्या निंदणाचा खर्च एक हजार ५०० रुपये आला; पण सतत तणाची झपाट्याने होत असलेली वाढ पाहता एक एकराला एक हजार ५०० रुपये येणारा तणनाशकाचा खर्च परवडणारा ठरत असल्याने तणनाशकाच्या फवारणीला वेग आला आहे.निंदण केल्यानंतर पावसाने उसंत दिली नसल्याने निंदणात व्यत्यय येत आहे. डवरणी होत नसल्याने तण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे निंदणाचा खर्च सातत्याने वाढतच आहे. या भागात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. पावसाच्या दडीमुळे ही लागवड उशिरा झाल्याने दोन फुली मधील अंतर झाकले गेले नसल्याने तणाची निरतंर वाढ होत आहे. मजुराच्या शोधार्थ शेतकऱ्यांना फिरावे लागत आहे. नरेगाच्या कामावर १६५ रुपये रोजी मिळत असल्याने मजूर शेतकऱ्यांना मिळेनासे झाले आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत या पाळीत ५० रुपये, सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात १२५ रुपये तर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या दोनही पाळीत १७५ ते २०० रुपये अशी मजुरी निंदणाकरिता सध्या दिली जात आहे. तर पुंजाने उचलणाऱ्या मजूर व्यक्तीला २५० रुपये तर फवारणीसाठी ३०० रुपये दिले जात आहे. (वार्ताहर)
निंदणाचा खर्च वाढल्याने तणनाशकाच्या खरेदीत वाढ
By admin | Updated: September 14, 2014 00:07 IST