गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे, हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्याही घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या चक्र पालटले असून ‘आम्हा हुंडा नको फक्त तुुमची मुलगीच हवी’, अशी आर्जव करण्याची वेळ उपवर पित्यांवर आलेली दिसून येत आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीचे वाईट दिवस आले आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी समाधानाने नांदावी अशीच आस असते. त्यापोटीच चांगला वर शोधण्यासाठी पिता समाजात फिरतांना दिसतो. सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधू पित्याची नजर कमावत्या मुलांकडे वळली आहे. त्या दृष्टीने वधू पिता मुलांकरिता शोध मोहीम राबवित असल्याचे दिसून येत आहे. पण, शेतकरी पित्याची मुलगी असो वा नोकरदार पित्याची मुलगी, सर्वच शेतकरी मुलाकडे दुर्लक्ष करीत आहे.निसर्गाच्या दृष्टचक्र तोट्याचा ठरणारा शेती व्यवसाय आणि मुलींच्या पित्यांचे असलेले नोकरदार मुलांचे स्वप्न त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहाच्छूक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी आत्महत्यांमागे नैसर्गिक आणि शासनाच्या अनास्थेने निर्माण झालेल्या कारणांप्रमाणेच शेतकऱ्यांनी स्वत: भोवती गुंडाळून घेतलेले सामाजिक प्रतिष्ठेची प्रथाही कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्नाचे बार धुमधडाक्यात उरकविण्याकरिता वाट्टेल ते करणाºया बहुतांश शेतकरी कुटुंबियांना आता बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळविण्याकरिता आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे मुलांकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करायला तयार होत आहे. तर काहींनी मुलींना हुंडाही दिल्याचे वास्तव असल्याने या परिस्थितीवरुन ‘मुला पेक्षा मुलगी बरी’ असे म्हणण्याची वेळ वर पित्यावर आली आहे.मुलींच्या शोधात वाढतेय वयवर्धा तालुक्यातील ६०० ते १ हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता ३५ ते ४० पार गेलेले दिसून येत आहे. परिसरात अनेक गावांमधील तरुण मंडळी मागील तीन ते चार वर्षांपासून लग्नाच्या प्रतिक्षेत आहे. तरी मुलगी मिळत नसल्याने शोधमोहीम सुरुच आहे. काही मुलांनी ‘तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा देता, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करतो. फक्त मुलगी द्या’ असाही निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. तरीही मुलगी मिळत नसल्याचे वास्तव आहेत.ही परिस्थिती वर्धा तालुक्याचीच नाही तर इतरही भागात हीच अवस्था आहेत.शेतकरी नवरा नको पण शेती हवीय...शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठी सध्या कोणताही पिता तयार होत नाही. आधी नोकरीला प्राधान्य दिले जाते. मुलगा नोकरीवर असल्यास त्याला मुलगी देण्याकरिता होकार दर्शवितात. परंतू काही ठिकाणी सध्या नोकरीसोबतच शेती आहे काय? असाही प्रश्न पुढे येतो.काहींना नोकरीसोबतच मुलाकडे शेतीही पाहिजे आहेत. यावरुन शेतकरी नवरा नको पण, शेती हवीय... कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लग्नाचा खर्च मीच करतो...फक्त मुलगी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:57 IST
पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे, हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्याही घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.
लग्नाचा खर्च मीच करतो...फक्त मुलगी द्या!
ठळक मुद्देउपवधुसाठी दाहीदिशा : हुंडा नको, फक्त मुलगी हवी म्हणण्याची मुलांवर आलीय वेळ