वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत येथे समूह संसाधन व्यक्ती यांची वर्धा ते ठाणे ८४ वर्धिनीच्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे आदींच्या उपस्थितीत सहाय्यक प्रकल्प अधिकारी (डीआरडीए) प्रवीण भालेराव यांनी हिरवी झेंडी दाखविली.या फेरीचे नियोजन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाद्वारे जिल्हा व्यवस्थापक अमोलसिंग रोटले, मनीष कावडे, मीनाक्षी अत्कुलवार, प्रवीण भांडारकर, सुकेशनी पाथार्डे व वर्धिनी संसाधन केंद्र चमू यांनी केले. वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी व सेलू या तालुक्यात इन्टेसिव्ह पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केलेली आहे. गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो, त्यासाठी त्यास आवश्यक सहाय्य दिले पाहिजे. या विश्वासातून गरिबांनी गरिबांच्या संस्था निर्माण करून त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने कुशल आणि प्रभावी व्यासपीठ देण्यात येत आहे. भारतातील ज्या ज्या राज्यात दारिद्रय निर्मूलनाचे प्रयोग यशस्वी झाले. अशा राज्यामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती यांनी अंत्यत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजे गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना मार्गदर्शन संघटन आणि सनियंत्रण करणाऱ्या व्यक्ती. अशा व्यक्ती त्या गावातील स्थानिक असाव्यात. समुदायातील असाव्यात जेणेकरुन त्याचे प्रश्न समस्या व गरजा इतरापेक्षा चांगल्या रितीने जाणू शकतात व सोडवू शकतात. वर्धिनी प्रत्यक्ष गावस्तरावर १५ दिवस रहवासी राहून सर्व्हे करणे, गटामध्ये समाविष्ट असणारे व गटाबाहेर असणाऱ्या महिलांची माहिती करणे, नवीन गटाची निर्मिती करणे, महिलांना अभियानात सहभागी करणे, गटाच्या सभा घेणे, मूलभूत गटाचे प्रशिक्षण घेणे, लेखे अध्यावत प्रशिक्षण घेणे, व्यावहारिक सजगता आणि बँक लिंकेजेसचे महत्त्व सांगणे, पंचायत राज व्यवस्थेबद्दल माहिती व ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढवणे इत्यादी कार्य करीत असतात. वर्धा जिल्ह्यातील एक स्वतंत्र कार्यप्रणाली असून ती एक प्रारूप म्हणून विकसित करावयाची आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण १८४ वर्धिनीचे कॅडर तयार करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातून जिल्हास्तरावर स्वतंत्ररित्या रांउड पाढविण्यात येत असून आतापर्यंत यवतमाळ, गोंदिया येथे राउंड पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वर्धिनी फेरी यशस्वी करण्याकरिता जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाने सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)
समूह संसाधन व्यक्तीची वर्धा-ठाणे वर्धिनी फेरी सुरू
By admin | Updated: August 9, 2015 02:14 IST