अरुण फाळके कारंजा (घाडगे)येथील महामार्गावर संत्रा उत्पादकांना सुविधा व्हावी याकरिता शासनाच्यावतीने पाच कोटी रुपये खर्च करून संत्रा निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते; मात्र शासनाच्या अनास्थेपोटी ते बंदच होते. हे केंद्र केवळ उद्घाटनापुरतेच मर्यादीत ठरले. आता नव्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिल्याने येथे १ मार्च पासून काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. संत्रा उत्पादकांचा पट्टा असलेल्या या भागात पाच कोटी रुपये खर्चून सात वर्षापुर्वी महामार्ग क्रमांक ६ वर संत्रा निर्यात व सुविधा केंद्र निर्माण केले होते़ चार एकर परिसरात थाटलेल्या या केंद्रात संत्राची कलिंग ग्रेडींग, स्टोअरींग व विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी ही अपेक्षा होती; पण प्रशासकीय दुर्लक्ष आणि संत्रा कुलींग तसेच स्टोरेजचा अधिक दर व नापिकी यामुळे हे केंद्र उभारणीपासूनच बंद होते़ हे केंद्र शोभेचा पांढरा हत्ती म्हणून कारंजाची शोभा वाढवित होते़शासनाच्या या अनास्थे व केंद्राच्या दुरवस्थेबद्दल हिवाळी अधिवशेन काळात ‘लोकमत’ने ‘संत्रा उत्पादकांच्या स्वप्नाचा चुराडा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला विशेष महत्त्व देत हे सुविधा केंद्र त्वरीत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार आता हे संत्रा निर्यात व सुविधा केंद्र पणन महासंघातर्फे महाआॅरेंज या संस्थेला दहा वर्षांकरिता प्रायोगिक तत्वावर चालवायला देण्याचा निर्णय झाला आहे. १ जानेवारी २०१५ पासून महाआॅरेंज संस्थेने हे केंद्र रितसर ताब्यात घेतले आहे़ या केंद्रात शेतकऱ्यांचा संत्रा विकत घेण्यासाठी एक मोठी संत्रामंडी सुरू होणार आहे. याकरिता शेडचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे़ महाआॅरेजचे संचालक श्रीधर ठाकरे व अनंत घारड हे या केंद्राची देखभाल करणार आहे़
संत्रा निर्यात सुविधा केंद्राला ‘अच्छे दिन’
By admin | Updated: February 22, 2015 01:52 IST