पराग मगर - वर्धाजगातील सर्वांग सुंदर आणि अनामिक हुरहुर लावणारं नातं म्हणजे मैत्री. ती झाली तर काही क्षणात अन्यथा वर्षानुवर्ष सोबत राहुनही अनेकदा मैत्रीचे रूणानुबंध तयार होत नाही. म्हणूनच या नात्याचा उत्सवही दरवर्षी विशिष्ट तारखेला नसतो. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी तो साजरा केला जातो. कालपरत्वे त्यात बदल होऊन आधी आॅफलाईन साजरा होणारा हा उत्सव आता आॅनलाईन साजरा होऊ लागला आहे. फेसबूक, व्हॉट्स अॅप, हाईक अशा माध्यमांद्वारे तो जगभर साजरा केला जात आहे. काही वर्षांपूर्वी (फेसबूक, व्हॉट्स अॅप हाईक ही साधने नसताना) जागतिक मैत्री दिवसाला प्रत्यक्ष भेटून धमाल मस्ती करीत हा दिवस साजरा होत होता. आताही तो होत नाही असेही नाही. पूर्वीपेक्षाही जास्त उत्साहाने साजरा होतो. पण यातला उत्साह आॅनलाईन जास्त असतो. दहा मित्र आज एका ठिकाणी भेटल्यावर मैत्री दिवस सेलिब्रेट करीत एखाद्या कट्ट्यावर बसले असले तरी जवळ बसलेल्या आॅफलाईन मित्रापेक्षा आॅनलाईन असलेल्या मित्राने व्हॉट्स अॅपवर काय पाठविलं याच कौतुक जास्त असत. जवळ बसलेल्या मित्राशी बोलत असताना मध्येच आपण मैत्रीवर केलेल्या पोस्टवर कुणाचे किती लाईक्स आणि किती कमेन्ट आल्या याकडेच जास्त लक्ष असतं. सगळ्यांच्याच जीवनाच्या कक्षा विस्तारल्या. त्यामुळे हा मैत्रीचा उत्सवही ग्लोबल झाला आहे. शिक्षण बदललं. फटाफट मित्रही बदलतात. अशावेळी प्रत्येकासोबतच भावनिक बंध जुळतोच असे नाही. हा इव्हेंट मात्र सेलिब्रेट होतोच. त्याचे स्वरूप वदलले हे नक्की. पण काही चांगल्या गोष्टीही यात घडतात. कधी काळी काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले मित्र पुन्हा किमान आॅनलाईन का होईना जवळ आले आहे. वर्षातून एक दिवस का होईना उमाळा दाटून त्यांची आठवण होते आणि मन भुतकाळात काही काळासाठी डोकावून पुन्हा वर्तमानात परत येतं आणि मैत्रीचा उत्सव साजरा झालेला असतो. या दिवसाला अजून सुंंदर आणि आठवणीचा करण्याकरिता बाजार सजले आहेत.
मैत्रीचा उत्सव झाला ‘आॅनलाईन’
By admin | Updated: August 3, 2014 00:14 IST