आर्वी : शासनाने प्रलंबित समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने १ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शासकीय कार्यालये ओस पडली असून नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत़ यावर तोडगा निघाला नसल्याने सामान्य नागरिक नाहक वेठीस धरले जात आहे.महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला होता़ मात्र शासनाने या आंदोलनाची दखल न घेता केवळ आश्वासने देण्यात आली, असा आरोप संघटनेने केला आहे़ नायब तहसीलदार पदाला राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला़ परंतु वेतन वाढवून देण्यात आले नाही़ महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्यांना महसूल सहाय्यक असे पदनाम देण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गातील पदे पदोन्नतीच्या माध्यमाने भरण्यात यावे, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदाकरिता गृहविभागाच्या धर्तीवर महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा रिक्त ठेवण्यात यावे, राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सायकल ऐवजी मोटरसायकलचे अग्रीम रक्कम देण्यात यावी, शिपाई प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना तलाठी पदासाठी पदोन्नती द्यावी, अनुकंपा तत्वावर सेवाभरतीसाठी टक्केवारीची अट रद्द करावी, हवालदार नाईक दप्तरी पदाचे मुळवेतन लिपिकाप्रमाणे द्यावे, जे वाहनचालक १२ ते १६ तास काम करतात त्यांना विशेष भत्ता द्यावा, व्यापगत झालेली पदे पुन्हा नव्याने भरण्यात यावी, महसूल कर्मचाऱ्यांवर अनेकदा विनाकारण हल्ले व मारहाण करण्याचे प्रकार सुरू झाले़ त्यावर आळा घालण्यासाठी विशेष कायदा करावा, शासनाच्या अनेक योजना राबविताना शासन महसूल विभागावर विशेष भर देते़ यापुढे या योजनांसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावे, इत्यादी मागण्या संघटनेने शासनाकडे पुढे केल्या आहेत़आंदोलनात सरचिटणीस एच़ एम़ लोखंडे, व्ही़ आऱ गोमासे, पी़ एस़ घाडगे, एम़ पी़ दहेलकर, ड़ी़ सी़ राऊत, यु़ जी़ कळंबे, एम़ व्ही़ गोल्डे, आशा निंभोरकर, एम़ व्ही़ तितरे, व्ही़ एस़ ढुमणे, एस़ एस़ मानेकर, आऱ बी़ मानेकर, आऱ बी़ वनकर, एम़ आऱ थुल, आऱ एच़ देशमुख, पी़ के़ अग्निहोत्री, सुमन इंगोले, जी़ डी़ फरकाडे, व्ही़ एम़ मांडवकर यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत़ या मागण्या तातडीने निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाने कामे रखडली
By admin | Updated: August 6, 2014 23:59 IST