घोराड : बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यात यंदा कोरडा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे़ पुनर्वसू नक्षत्राचे अवघे सहा दिवस शिल्लक आहेत़ शेतकरी दुबार पेरणीच्या मन:स्थितीत आहे़ रोहिणी, मृग, आर्द्रा व पुनर्वसू हे चारही नक्षत्र कोरडे जात असल्याने दुबार पेरणीत कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नाही़ आहे ते महाग; पण उगवेलच याचा भरवसा नाही़ अशातच एक ते दीड महिना पेरणी उशिरा केल्यानंतर उत्पादनाची हमी नाही़ पुन्हा पावसाने अशीच दडी मारली तर पुन्हा आर्थिक दृष्ट्या हतबल होण्याची वेळ येईल, अशा संभ्रमात असलेला शेतकरी यंदा कोरडा दुष्काळच आहे, असे सांगतो़ श्रावण मास २७ जुलैपासून प्रारंभ होत आहे़ सणाचे दिवस सुरू झाले असून मजुरांच्या हाताला काम नाही़ ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही ढासळली आहे़(वार्ताहर)पेरण्या खोळंबल्यागत दीड महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे़ खरिपाच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत़ यामुळे यंदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचेच दिसते़दरवर्षी जून महिन्यात मृग नक्षत्रात पावसास सुरूवात होते़ दमदार पाऊस व विजांचा कडकडाट, असे वातावरण असते; पण यंदा अद्याप पावसाचेच आगमन झाले नाही़ जून व जुलै महिन्यात उन्हाळा असल्यागत उन्ह ताप असल्याने उकाडा आहे़ विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली असून नदी, नालेही कोरडे पडले आहे़ यामुळे पूढे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे़ काही हिरवळ दाटलेल्या शेतांत हरिण, रोही, रानडुकरे हैदोस घालत आहे़ शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरलेले बियाणे उगवले़ रानात मोजक्या शेतांत हिरवळ असल्याने वन्यप्राणी बियाणे उकरून खात आहे़ दुसरीकडे उन्हामुळे बियाणे व अंकूर करपत आहे़ जुलै महिना अर्धा संपत आला असला तरी पावसाचे चिन्ह दिसत नाही़ यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ पेरणीला उशीर झाल्याने येणाऱ्या उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे़ पाऊस पडावा म्हणून देवाला साकडे घालून महापूजा, आरती भजने केली जात आहे़ अनेक गावांत पाऊस नसल्याने नद्या-नाले, विहिरी कोरड्या झाल्यात़ यामुळे काही गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून शेतकऱ्यांसह सर्वच पावसाची प्रतीक्षा करीत आहेत़(वार्ताहर)
कोरड्या दुष्काळाचे सावट गडद
By admin | Updated: July 15, 2014 00:08 IST