सिंधू सपकाळ : व्याख्यानातून महिलांना दिला वडीलकीचा सल्लादेवळी : बायांनी संस्कृती जोपासली आहे. घरात एक भाकरी असेल तर स्वत: उपाशी राहून मुलांचे व कुटुंबीयांचे भरण करणारी तीच माऊली आहे. अहल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर या विभुतींनी माणूस घडविल्याची उदाहरणे आहे. आजच्या तरूणी उद्याच्या माया आहे. त्यामुळे नववारी घाला. अंग झाका. मराठी संस्कृतीचे उघडेनागडे प्रदर्शन करू नका. विदर्भाची रुख्मिणी बना, सैराट बनू नका, असा वडीलकीचा सल्ला डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी दिला. भोंग सभागृहात पंकज तडस व मित्र परिवाराच्यावतीने आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. समाजमनाला हेलावून टाकणारे विचार त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शंकर धोटे महाराज रीठ देवस्थान, पंतजली योग समितीचे प्रदेशाध्यक्ष विष्णू भुतडा, तहसीलदार तेजस्विनी जाधव, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. मार्इंनी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला टोलावत खडतर जीवन व्यतित केले. जीवनदायी ठरलेला त्यांचा हा प्रवास समाजातील युवतींना तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना प्रेरणादायी ठरावा म्हणून त्यांनी विचार व्यक्त केले. आपल्याला जगायचे आहे, हे घरधन्याला पटवून द्या. मी तुमची आहे. आहे त्या परिस्थितीत राहू. उद्याचा दिवस नक्कीच आपला राहणार आहे, असा धीर द्या. शेतकरी आत्महत्या होणार नाही, याची हमी देतो. कोणत्याही गोष्टीत हार मानू नका म्हणजेच जीवन सफल होईल. ऐन उमेदीच्या काळात सासर व माहेरच्या लोकांनी घराबाहेर हाकलले. २० वर्षांचे वय व कडेवर बाळ, अशा कठीण अवस्थेत आयुष्याची भ्रमती सुरू झाली. विना तिकीट रेल्वेने प्रवास केला. अनेक गाड्या व स्टेशने बदलली. रस्ता मिळत नव्हता. पोटाची खळगी भरण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी यांचे भजन म्हणून भिक मागितली. डोक्याला पाणी नाही, फनी नाही, अशा अवस्थेत संपूर्ण मुलूख पालथा घातला. समाजाच्या भेदक नजरा टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी स्मशानघाटाचा आसरा घेतला. भूक माणसाला बुद्धी देते, याची अनुभूती म्हणून स्मशानातील पूजेचे कणकीचे गोळे घेऊन जळणाऱ्या सरणावर भाकर भाजली. कटाकट खाल्ली. आयुष्य असंच चालत गेले. तीन वेळा आत्महत्येचा विचार डोक्यात आला; पण आत्महत्या करण्याची वेळ ठरत नव्हती. मन धजावत नव्हते. यावेळी इतरांची दु:खे आपल्यापेक्षा मोठी असल्याचे लक्षात आले. अनाथांच्या व्यथा जवळून पाहता आल्या. माझ्या पतीला मी माफ केले. कारण, त्यांनी मला सोडले नसते तर मी घडले नसते. हजारो लेकरांची माय झाली नसती. राष्ट्रपतीकडून तीनदा सन्मान तसेच ७५५ पुरस्कारांचे मानकरी ठरले नसते, अशी जीवनगाथा व्यक्त करून मार्इंनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. यावेळी डॉ. अनिता पाल, चंदा गहलोत, सुमन वैद्य, खोडके, तारा गंभीर, सुमन जयपुरकर या महिला उपस्थित होत्या. दिपप्रज्वलन तसेच उपस्थितांचे भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. तडस परिवाराकडून राम तडस, सुनीता मेहरे, निलीमा वाघमारे, माधुरी तडस व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात पंकज तडस यांनी शहरातील महिला गटांना प्रत्येकी ५० हजारांचे साहित्य व स्वाती रामदेव बाबांचे तीन दिवसीय शिबिर घेणार असल्याचे सांगितले. यावेळी रघुनाथ पेटकर, चंपत दारव, माला मानकर, बेबी भोयर, चिंतामन पर्बत, प्रभा बकाने आदी ज्येष्ठांना काठीचे वाटप करण्यात आले. संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार शैलेश पाळेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जयश्री नरड, निकीता निवल, अश्वीन कारोटकर, अतुल कुऱ्हाडकर, विलास भुसारी, सुस्तम दुर्गे, विजय सोनटक्के, राम खोंड तसेच पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
रुख्मिणी बना, सैराट बनू नका
By admin | Updated: October 2, 2016 01:00 IST