आरक्षणाची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन सादरवर्धा : धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात आला आहे; मात्र जमातीत असलेल्या सेवा सुविधांचा लाभ धनगर समाजाला मिळत नाही. तो लाभ देण्याकरिता शासनाकडून टाळाटाळ होत आहे. धनगर समाजाला जमातीनुसार आरक्षण देण्यात यावे, या मागणीकरिता गुरुवारी धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मेंढ्या नेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवदेनात, भारतीय संविधानातील अनुसूचित जमातीमध्ये असलेल्या धनगर जमातीला राज्यात गत ६४ वर्षांपासून न्याय मिळाला नाही. संविधानाच्या अनुच्छेद १४, १५, १६, २४४, ३३५ व परिशिष्ट पाच नुसार धनगर, धनगड व ओरेन या जमाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असताना राज्य शासनाकडून त्यांना कुठल्याही सवलती दिल्या जात नाहीत. या सवलती देण्याचे राज्यकर्त्यांकडून टाळण्यात येत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. येथील बॅचलर मार्गावर असलेल्या अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. बजाज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सदर मोर्चाला न्यायालयाच्या प्रथम द्वाराजवळच अडविले. यानंतर शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी समाजाच्या काही युवकांनी कार्यालयात मेंढ्या नेण्याचा प्रयत्न करताना त्यांना पोलिसांनी अडविले. निवदेन देताना राजू गोरडे, प्रकाश भोयर, अरुण लांबाडे, दीपक पुनसे, विनायक नन्नुरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)
धनगर समाजाचा मोर्चा
By admin | Updated: August 8, 2014 00:07 IST