आष्टी (श.) : नजीकच्या सावंगी (पुनर्वसन) ग्रामपंचायत येथील सरपंच निलेश ठाकरे यांनी गावातील प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत प्रहारचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, उपविभागीय महसूल अधिकारी मनोहर चव्हाण, तहसीलदार प्रकाश महाजन यांनी मंडपाला भेट देत मागण्यांबाबत चर्चा केली़ सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.सावंगी (पुनर्वसन)ला महसूल मौजा देण्यात यावा, स्वस्त धान्याचे व केरोसिनचे स्वतंत्र दुकान द्यावे, पोलीस पाटलाची नियुक्ती करावी, हिंदू व मुस्लीम स्मशानभूमीसाठी जागा द्यावी, घरकूल लाभासाठी बीपीएलची अट रद्द करावी या प्रमुख मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या़ प्रशासनाला वारंवार कळवूनही दखल घेतली जात नव्हती. यामुळे गावाच्या विकासावर परिणाम झाला होता. मागण्यांबाबत पाठपुरावा करूनही काहीच हाती लागत नव्हते़ यामुळे नवनियुक्त सरपंच निलेश ठाकरे यांनी निवेदन सादर करीत आमरण उपोषण सुरू केले़ उपोषणाबाबत माहिती मिळताच उपविभागीय महसूल अधिकारी मनोहर चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सावंगी (पुनर्वसन) गाव गाठले़ यावेळी सरपंचासह ग्रामस्थांशी चर्चा करून मागण्या मंजूूर करण्यात आल्या. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. पुनर्वसनानंतर प्रथमच स्वतंत्र पद मान्य करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या मागण्या मंजूर झाल्यामुळे गावाच्या विकासास हातभार लागणार असल्याचे सरपंचाने सांगितले.(प्रतिनिधी)
मागण्या मान्य; सरपंचाच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: July 9, 2014 23:50 IST