विरूळ (आ़) : आर्वी तालुक्यात सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या विरूळ ग्रामपंचायतीचा कारभार सध्या रामभरोसे झाला आहे़ ग्रामसेवक गोरे यांची बदली झाली़ रिक्त जागेचा प्रभार खरांगणा (मो़) येथील ग्रामसेवकाला तात्पुरता देण्यात आला आहे़ सदर ग्रामसेवक आठवड्यातून तीन दिवसच ग्रा़पं़ मध्ये येत असल्याने गावातील विकास कामे ठप्प झाली आहेत़ यामुळे कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा, अशी मागणी होत आहे़ आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून विरूळची ओळख आहे़ या गावात ग्रामपंचायतची निवडणूक न घेता गावकऱ्यांनी अविरोध ११ सदस्यांची निवड केली आहे़ गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य गावाचा विकास व्हावा म्हणून सर्वत्र एकजुटीने कामाला लागले आहेत; पण पंचायत समितीच्या उदासीन कारभारामुळे गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळालेला नाही़ यामुळे गावातील विकास कामे खोळंबली आहे़ सध्या पावसाचे दिवस आहे़ अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ गावालगतच रस्त्यावर लोकांनी शेणाचे ढिगारे ठेवले असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे़ पिण्याच्या पाण्यात वेळेवर ब्लिचिंग पावडर टाकले जाते की नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे़ गावात नियमित ग्रामसचिव नसल्याने समस्या वाढत आहेत़ ग्रामसेवक नसल्याने ग्रामस्थांची कामेही खोळंबली आहेत़ गावात कोणता शासकीय निधी येतो, याची माहिती ग्रामस्थांना नसते़ आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची ही मागणी लक्षात घेत कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़(वार्ताहर)
कायमस्वरूपी ग्रामसचिवाची मागणी
By admin | Updated: August 1, 2014 00:25 IST