हिंगणघाट : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर शहरालगत रेल्वे फाटक क्र. १४ च्या रखडलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम गत कित्येक वर्षांपासून रखडले आहे. हे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी भुगावकर यांच्यामार्फत मध्य रेल्वेच्या मंडळ प्रबंधकांना निवेदन देण्यात आले आहे. शहराच्या पूर्व दिशेने असलेल्या नागपूर-हैदराबाद महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. १४ च्या उड्डाण पुलाचे बांधकाम गत पाच वर्षांपासून सुरू आहे. हे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असले तरी अद्याप रेल्वे फाटक क्र. १४ च्या रेल्वे हद्दीतील बांधकामाला सुरूवात झाली नाही. याचा फटका दळणवळणाला बसत आहे. रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रबंधकांनी खासदार रामदास तडस यांच्यासह शिष्टमंडळाला देण्यात आले होते. या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी लोटला; पण कामाला सुरूवात झाली नाही. बांधकाम अर्धवट असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतुकही मोठी आहे. शहरातील मोठी लोकवस्ती महामार्गाच्या पलीकडे आहे. यामुळे वाहनांची व पादचाऱ्यांची गर्दी असते. रेल्वेचा मार्ग व्यस्त असल्याने प्रत्येक अर्ध्या तासाने रेल्वे फाटक बंद असते. याबाबत रेल्वे विभागाला अनेकदा निवेदने देण्यात आली; पण रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आपने केला आहे. या अर्धवट रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी माणगी आपने केली आहे. निवेदन देताना आपचे मनोज रूपारेल, प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, कपील खोडे, संदीप बुटले, विकेश नगराळे, नरेंद्र चुंबळे, विनय टिपले, काशिनाथ नांदुरकर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण करा
By admin | Updated: August 13, 2015 02:52 IST