भिडी : स्थानिक ग्रामपंचायतीची स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली होती़ ती सभा शनिवारी सरपंच नारायण देवनळे यांच्या अध्यक्षतेत व उपसरपंच नितीन दिघाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गदारोळातच पार पडली़स्वातंत्रदिनी कोरमअभावी येथील ग्रामसभा तहकूब करण्यात आली होती़ ही ग्रामसभा शनिवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आली़ ग्रामसभेस नागरिकांचा प्रचंड सहभाग होता. ग्रामसभा सुरू होताच शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यानंतर लगेच तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षाच्या निवडीचा विषय घेण्यात आला़ हा विषय येताच उपस्थितांत प्रचंड गोंधळ सुरू झाला़ यावेळी उपस्थितांमध्ये हमरीतुमरी झाली़ या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. शेवटी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी देवळी पोलीस ठाण्यात माहिती देऊन पोलीस संरक्षण मागितले़ पोलीस येईपर्यंत सभा तहकूब करण्यात आली. पोलिसांच्या संरक्षणात सभा सुरू झाल्यानंतर तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडीकरिता गुप्त मतदान घेण्यात आले. भिडीच्या इतिहासातील अशा अभुतपूर्व गोंधळाची व गुप्त मतदानाची पाहिलीच घटना आहे़ यात मोंटू भोंगाडे याची अध्यक्षपदी निवड करण्यात आली़ यानंतर सभा समाप्त करण्यात आली. राजकीयदृष्ट्या भिडी गाव अतिशय संवेदनशील आहे़ येथे राजकीय गटा-तटाचे राजकारण नवीन नाही; पण मागील काही वर्षांत तरूणांच्या हातात सत्तासुत्रे गेल्याने ज्येष्ठ व राजकीय धुरंधर मीच गावपुढारी म्हणणारे खड्यासारखे बाजूला झाले़ युवकांना मार्गदर्शक न उरल्याने ग्रामसभेतही युवकांचा भरणा अधिक राहत असल्याने विकासाचे मुद्दे बाजूला राहून गदारोळच अधिक होतो़ यामुळे ग्रामसभेतही हाणामारीसारख्या कलंकित घटनांनी गावाचे नाव डागाळत असल्याचे दिसते़ अशा अनुचित घटना घडू नये, यासाठी गटा-तटाचे, पक्षाचे, सत्तेचे राजकारण विसरून गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी एकत्र येऊन युवकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे़ सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते़(वार्ताहर)
पोलिसांच्या संरक्षणात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड
By admin | Updated: August 26, 2014 00:09 IST