सेलू : गावालगत असलेल्या बोरनदीवरील बंधाऱ्यात सेलू शहरातील सांडपाणी साचले असले आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.सेलू येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बंधण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बोर नदी प्रवाह बंद होतो. त्यामुळे या बंधाऱ्यात अडणारे पाणी सेलू शहराची तहान भागवत असते. शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा धोरणाचा पुरेपूर अवलंब येथे होत असला तरी या बंधाऱ्यात अडणारे पाणी कोणते याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.गावाचे रूपांतर आता शहरात झाले. गावाचा विकास झपाट्याने झाला. रस्ते, नाल्याचे बांधकाम झाले. पण गावातील संपूर्ण सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रात सोडण्यात येते. असे पाणी बंधाऱ्यात अडून राहात असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पाण्यावर शेवाळीची झालर पसरली असल्याने ते आणखी दूषित होत आहे. या बोरतिरावर सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक विहीर आहे. याच तिरावर आठवडी बाजारही भरतो. मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाला ताजा राहावा म्हणून याच नदीचे पाणी त्यावर शिंपडल्या जाते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या नदीचे सेलू शहरालगत असलेले संपूर्ण पात्र बेशरमच्या झाडांनी व शेवाळाने व्यापले आहे. ग्रामपंचायतद्वारे नदी स्वच्छता अभियान राबवून पात्राचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याच्या हालचाली सुरू असताना सेलू ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायतीची स्थापना झाली. सध्या प्रशासक नियुक्त असून नगर पंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर गावातील सांडपाणी नदीच्या पात्रात येणार नाही यासाठी प्रयत्न होणार काय याकडे सेलू वासियांचे लक्ष लागले आहे. या बंधाऱ्यात अडणारे पाणी दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
सांडपाण्याने बंधारा दूषित
By admin | Updated: April 24, 2015 01:57 IST