आष्टी(श.) : देशातील लोकांनी विचार करणे सोडले असल्याने चेतना मृत झाली आहे. ती जागृत व्हावी, विद्यार्थ्यांचे मत प्रज्वलीत व्हावे. आष्टीत केल्या गेलेल्या अहिंसात्मक क्रांतीचे स्फुलींग सर्व देशवासियांना कळावे. या करिता आष्टी हे नागरिकांचे प्रेरणास्थान व्हावे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके यांनी केले.शहीद स्मृती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक समिती अंतर्गत शैक्षणिक परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात १९४८ च्या छोडो भारत आंदोलनात हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक भाष्कर ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. दादाराव केचे, उपाध्यक्ष डॉ. सुरेश ठाकरे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक एकनाथ हिरुडकर, कौसल्याबाई ठाकरे, अरविंद वानखडे, जि. प. सभापती नंदू कंगाले, पं. स. सदस्य छाया पांडे, उपसरपंच अशोक विजयकर उपस्थित होते. प्रारंभी सर्व पाहुण्यांतर्फे हुतात्मा स्मारकावर शहीदविरांना आदरांजली वाहण्यात आली. क्रांतीस्थळावर शहीदांच्या छायाचित्रांचे पूजन करुन व्यासपीठावर हुताम्यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ‘जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले’ या गितासह ‘आष्टी एक विरगाथा’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. अरविंद वानखेडे म्हणाले, शहीद विरांच्या कर्तृत्वामुळे आपणास स्वातंत्र्याची पहाट पाहावयास मिळाली त्यांचे बलिदान सर्व भारतीयांना प्रेरणादायी ठरावे. वर्धा येथील शिक्षिका कांता मेंढे दिग्दर्शित ‘मी राधाबाई मालपे बोलते’ ही नाट्यछटा वर्ग १० ची वर्धेची विद्यार्थिनी अबोली निर्मळ हिने सादर केली. याप्रसंगी डॉ. सुरेश ठाकरे, अरविंद वानखडे, एकनाथ हिरूडकर यांचीही भाषणे झालीत. राजाभाऊ मेंढे यांनी वसतिगृहासाठी वॉटर फिल्टर भेट दिले, तर वसतिगृहातील ३१ मुलांपैकी चार मुलांचे १९४२ च्या क्रांतीलढ्यातील रिंगलिडर मोतीराम होले यांचे चिरंजीव रवींद्र होले, डॉ.सुरेश ठाकरे, सी. ए. अण्णाजी साळवीकर, डॉ.गजानन होले यांनी पालकत्व स्वीकारले. अध्यक्षीय भाषणात १९४२ च्या लढ्यातील स्फूर्तीमय बाबी भाष्कर ठाकरे यांनी विषद केल्या.कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष भरत वणझारा, सचिव सुभाष दारोकर, कोषाध्यक्ष राजा सव्वालाखे, संचालक जवाहर भार्गव, शंकर कोल्हे, प्राचार्य डी.बी. खूणे, प्राचार्य बी.यू.हांडे, प्राचार्य एस. एम.चौधरी, प्राचार्य शारदा ढोले, मुख्याध्यापक एस. एस. बोबडे, डी. एल. वाघ, पुष्पा मालपे, राहूल ठाकरे, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे आप्तस्वकीय, गणमान्य व्यक्ती, महिला, विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन प्रा.कल्याणी मोहोड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.निलेश ठाकरे यांनी केले. राष्ट्रवंदनेने श्रद्धांजली समारंभाचा समारोप करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)
आष्टी देशवासीयींचे प्रेरणास्थान व्हावे - फाळके
By admin | Updated: August 3, 2014 00:15 IST