खरांगणा (मोरांगणा): तब्बल अकरा महिन्यांनी का होईना शासनाने गत वर्षाच्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे़ खरांगणा परिसरातील एकूण ५६४ शेतकऱ्यांना १० लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे़ खरांगणा साझा क्रमांक ३० मध्ये तळेगाव (रघुजी), मोरांगणा, खरांगणा व पाटण ही महसुली गावे येतात़ मागील वर्षी जुलै, आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आर्वी तालुक्यातील असंख्य गावे बाधित झाली होती़ यात शेतजमिनी खरडून निघाल्या होत्या़ नदी-नाल्या काठावरील घरे पुराने वाहून गेली होती़ त्यावेळी शासनाने तातडीने मदत दिली होती; पण ती शेतकऱ्यांच्या पदरी पडलीच नव्हती़ स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी, महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी शेतीचा सर्व्हे करून शासनास अहवाल सादर केल्यानंतर आता कुठे आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे़खरांगणा साझा क्रमांक ३० मधील मोरांगणा येथील ७२़४० हेक्टर आऱ शेती बाधित झाली असून १९१ शेतकऱ्यांना ३ लाख ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली़ खरांगणा येथे ५६़९५ हे़आर मधील नुकसानीपोटी १८८ शेतकऱ्यांना २ लाख ८० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली़ पाटण येथील २३़९० हेक्टरआर बाधित शेतजमीन कसणाऱ्या ६६ शेतकऱ्यांना १ लाख १९ हजार याप्रमाणे एकूण ५६४ शेतकऱ्यांना २१९़८५ हेक्टर आरकरिता १० लाख ९४ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली़ काही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही़ काही शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते क्रमांक प्राप्त झाले नसून त्यांनी त्वरित कार्यालयात खाते क्रमांक द्यावा, असे आवाहन तलाठी कांबळे यांनी केले आहे़ अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी पाच हजारांप्रमाणे शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली़(वार्ताहर)
५६४ शेतकऱ्यांना १०.५० लाख
By admin | Updated: July 10, 2014 23:43 IST