राजेश भोजेकर वर्धादरवर्षीपेक्षा यंदाची दुष्काळी स्थिती भीषण आहे. दुष्काळ काळात पिकांना भाव असतो. यंदा पिकांनाही भाव नाही. जिल्ह्यात १,३८७ गावे खरीप हंगाम पिकाखालील आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १,३४१ पैकी १,०४९ गावांची खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० व त्यापेक्षा आत आहे, तर केवळ २९२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक असली तरी तीसुद्धा ५१ ते ६० च्या घरातच आहे. ही स्थिती बघता संपूर्ण वर्धा जिल्हाच यंदा दुष्काळाच्या गदड छायेत आहे. ही भीषण स्थिती असलेला वर्धा जिल्हा विदर्भातील एकमेव आहे.समुद्रपूर तालुक्यातील २२२ पैकी खरीपाखालील सर्व २१९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. या पाठोपाठ आर्वी तालुक्याचा क्रमांक लागतो. आर्वी तालुक्यातील खरीप पिकाखालील २१९ पैकी १७२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. हिंगणघाट तालुक्यातील १८८ पैकी खरीपाखालील सर्व १८७ गावांची पैसेवारीही ५० पेक्षा कमी आहे. देवळी तालुक्यातील १५० पैकी खरीप पिकाखालील १४९ गावांमध्येही दुष्काळी स्थिती आहे. या सर्व गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. सेलू तालुक्यातील १७५ पैकी खरीपाच्या सर्व १६८ गावांमध्ये भीषण दुष्काळी स्थिती आहे. या सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. वर्धा तालुक्यातील १५५ पैकी खरीप पिकाखालील १५४ गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. कारंजा आणि आष्टी तालुक्यात मात्र शासनाच्या लेखी दुष्काळी स्थिती नसल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये कारंजातील १२० आणि आष्टीतील १३६ यासोबतच आर्वीतील ३६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
१०४९ गावांवर दुष्काळाची गडद छाया
By admin | Updated: November 22, 2014 01:31 IST