ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी जवळजवळ पूर्णत्वास गेली असून जि.प.च्या ५३ गटांसह पाच पंचायत समित्यांच्या १०६ गणांची आरक्षण सोडत १२ आॅगस्ट रोजी काढण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा परिषदेच्या या गटांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार, पूर्ण तयारी म्हणून जाहीर होणाऱ्या ५३ गटांचे आरक्षण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, या जातीनिहाय व महिलांच्या ५० टक्के आरक्षणाची सोडत या गटांमधून काढली जाणार आहे. याप्रमाणेच जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या १०६ गणांमध्येही प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासाठी १२ आॅगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. या दिवशी जिल्हा परिषदेच्या गटांची सोडत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये महसूल विभागाद्वारे ही सोडत काढली जाणार आहे. तर, याच दिवशी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयांमध्ये पंचायत समित्यांच्या १०६ गणांमधून आरक्षण सोडत काढून विविध प्रवर्गांसाठी गण राखीव केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
जि.प. गटांची आरक्षण सोडत १२ आॅगस्टला
By admin | Updated: August 10, 2015 23:08 IST