जितेंद्र कालेकर, ठाणेएमडी (मेफे ड्रॉन) पावडरपेक्षाही स्वस्त आणि तासभर प्रभाव ठेवणाऱ्या सोल्युशनचाही झोपडपट्टीतील मुले आणि हमाल यांच्याकडून वापर केला जात आहे. छुप्या पद्धतीने याची विक्री करणाऱ्या एका महिलेला चार महिन्यांपूर्वी कल्याणमधून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली होती. अशाच विक्रेत्यांच्या शोधासाठी पोलिसांनी एक मोहीमच सुरू केली आहे. अशा नशाबाजांविरुद्ध आणि विक्रेत्यांविरुद्ध ठाणेकरांनीही एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे. नशा करणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांकडून नशेसाठी नवनवीन मार्ग अवलंबले जात आहेत. मिथाईल बेंन्झीन असलेल्या ‘टोल्युन’ या रसायनाचाही असाच सर्रास वापर केला जातो. हे टोल्युन एका रुमालात भिजवून त्याचा वास घेतल्यानंतर तासभर त्याचा प्रभाव राहतो. काही काळ नशा करण्यासाठी रेल्वेचे हमाल, गरीब आणि उच्चभ्रू घरांतील मुलेही त्याचा वापर करतात. कल्याणमध्ये ४० रुपयांमध्ये १० मिलीची छोटी बाटली विकणाऱ्या महिलेला पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने अटक केली होती. या नशेचा वारंवार वापर करणारी मुले पुढे गैरकृत्येही करतात. आपल्या मुलांकडून अशा कोणत्याही प्रकारच्या विषारी पदार्थाचे सेवन केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुख्यत: तरुणांना या पदार्थांच्या विक्रेत्यांकडून प्रलोभने दाखविली जातात. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा अमली पदार्थविरोधी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी केले आहे.----अमली पदार्थविरोधी पथकाने जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत एमडी पावडरसह अमली पदार्थविक्री आणि बाळगणाऱ्यांविरुद्ध २३ गुन्हे दाखल करून ४५ आरोपींना अटक केली. तर, जानेवारी ते सप्टेंबर २०१५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत ३० गुन्हे दाखल करून ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. लोकमतने सुरू केलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या मोहिमेंतर्गत एकत्र येऊन अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देऊन तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.--------एलएसडी (लिथर्जिक अॅसिड) हे छोट्या पेपरवर घेऊन पबसारख्या ठिकाणी नशेसाठी वापरतात. त्याचा अमली पदार्थांमध्ये समावेश नसल्यामुळे त्याची विक्री करणाऱ्यांवर एनडीपीएसअंतर्गत पोलिसांना कारवाई करता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संबंधितांवर विषारी द्रव्यांची विक्री केल्याच्या कलमांखाली ३२८ नुसार कारवाई केली जाते. सोल्युशन आणि एलएसडीचे सेवन करणाऱ्यांच्या श्वसनयंत्रणेवर आणि तोंडावर परिणाम होतो. त्यातच त्यांचा मृत्यू होतो. व्हाइटनरचाही अशाच प्रकारे नशेसाठी वापर होतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांची आणि नशा करणाऱ्यांची माहिती पोलिसांना ०२२-२५३९६६८७ या क्रमांकावर देण्याचे आवाहन अमली पदार्थविरोधी पथकाने केले आहे.
सोल्युशनच्या वासाचीही नशा
By admin | Updated: October 1, 2015 23:44 IST