उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीची चावी शिंदेसेनेकडे; ९ विशेष समित्यांपैकी ४ भाजपाकडे, कोणाला कोणती समिती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:36 IST2026-04-15T20:33:23+5:302026-04-15T20:36:25+5:30
महापालिकेच्या तिजोरीची चाबी शिंदेसेनेच्या कलवंत सिंग सहातो यांच्याकडे जाणार हे स्पष्ट झाले आहे. ९ विशेष समिती सभापती पदांपैकी प्रत्येकी ४ सभापती पदे शिंदेसेना व भाजपाकडे जाणार आहेत.

उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीची चावी शिंदेसेनेकडे; ९ विशेष समित्यांपैकी ४ भाजपाकडे, कोणाला कोणती समिती?
उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती व अन्य ९ विशेष समिती सभापती पदे भाजपा व शिंदेसेनेने सर्वसंमतीने वाटप करून प्रत्येक समितीला प्रत्येकी एक अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेच्या तिजोरीची चाबी शिंदेसेनेच्या कलवंत सिंग सहातो यांच्याकडे जाणार हे स्पष्ट झाले आहे.
९ विशेष समिती सभापती पदांपैकी प्रत्येकी ४ सभापती पदे शिंदेसेना व भाजपाकडे जाणार आहेत. तर एक समिती साई पक्षाला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीला उपमहापौर पदानंतर, सभापती पदानेही हुलकावनी दिली आहे. येत्या २० एप्रिल रोजी अधिकृतपणे सभापतीची निवड घोषित केली जाणार आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्यानंतर, सत्तेसाठी भाजपा आणि शिंदेसेना पक्ष एकत्र आले आहेत. महापौरपद शिंदेसेनेच्या (ओमी कलानी गट) अश्विनी निकम यांच्याकडे, तर उपमहापौरपद भाजपाकडे गेले आहे.
शिंदेसेनेला कोणत्या समित्या?
स्थायी समिती सभापती पदासह विशेष समिती सभापती पदासाठी बुधवारी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने, सर्वच सभापतींची निवड बिनविरोध होणार आहे. तिजोरीच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे सभापती पद शिंदेसेनेकडे गेले असून, कलवंत सिंग सहातो यांचा त्यासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मनली जात आहे.
९ विशेष समित्यांपैकी प्रत्येकी ४ समित्या शिंदेसेना व भाजपाकडे गेल्या आहेत. तर साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सभापती पद जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी यावेळीही सभापती पदापासून वंचित राहणार आहेत.
महापालिका विशेष समित्यांपैकी नियोजन व विकास समितीसाठी मीना कौर लबाना, पाणी व पुरवठा समितीसाठी दीपा पंजाबी, आरोग्य समितीसाठी सविता तोरणे-रगडे, शिक्षण समितीसाठी साक्षी सुर्वे अशा चार समित्या शिंदेसेनेला मिळाल्या आहेत.
भाजपाला कोणत्या समित्या?
गलिच्छ वस्ती व निर्मूलन समितीसाठी विपुल मयेकर, क्रीडा समाजकल्याण व सांस्कृतिक समितीसाठी प्रीती माखीजा, महिला व बालकल्याण समिती मीना सोंडे व महसूल समितीसाठी प्रेरणा माखीजानी या चार समित्या भाजपकडे गेल्या आहेत.
प्रत्येक समितीसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने, सर्वच सभापती पदाची निवड बिनविरोध होणार आहे. २० एप्रिल रोजी अधिकृतपणे सभापती पदाची निवड पिठासीन अधिकारी घोषित करणार आहेत.