शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ऋषीतुल्य आबा

By admin | Updated: January 29, 2017 03:03 IST

आकाशाच्या छताखाली आटपाट नगर आहे. शब्द-सूर आणि संस्कृतीचं माहेरघर आहे. सण होतात, उत्सव होतात, महोत्सवही होतात आणि औटघटकेचे न होता इथल्याच मातीत

- राजीव जोशीआकाशाच्या छताखाली आटपाट नगर आहे. शब्द-सूर आणि संस्कृतीचं माहेरघर आहे. सण होतात, उत्सव होतात, महोत्सवही होतात आणि औटघटकेचे न होता इथल्याच मातीत रुजून जातात. गावाला सुसंस्कृतीचा चेहरा देऊन जातात. या आटपाट नगराचं नाव आहे डोंबिवली. येथे नव्वदावं साहित्य संमेलन आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. साहित्य संस्कृतीचा उत्सव गावाला नवा नसला तरी साहित्याचा महोत्सव असं ज्याला सार्थ म्हणता येईल असा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता येणार आहे. द.भा. धामणस्कर आज साहित्यक्षेत्रात, विशेषत: कवितेत अनेकांचे श्रद्धास्थानं आहेत. कुणालाही तोडून न बोलणारे, आवाज कधीही न चढवणारे, मैत्रीचा प्रवाह राखण्यासाठी पुढाकार घेणारे, आपली चूक नसतानाही, प्रसंगी हातात हात घेऊन माफी मागणारे, निर्व्यसनी आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे धामणस्कर.धामणस्करांनी कविता लेखनाला १९४७ मध्ये सुरुवात केली. असं असलं तरी धामणस्करांचा पहिला कवितासंग्रह ‘प्राक्तनाचे संदर्भ’ पस्तीस वर्षानंतर १९८२ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर दुसरा संग्रह ‘बरेच काही उगवून आलेले’ जवळपास वीस वर्षानंतर २००१मध्ये प्रकाशित झाला. त्यांचा तिसरा कवितासंग्रह ‘भरून आलेले आकाश’ नुकताच डिसेंबर २०१६ मध्ये जवळपासव पंधरा वर्षांनी प्रसिद्ध झालेला आहे. प्रसिद्धीबाबत कमालीची अलिप्तता असणाऱ्या धामणस्करांसाठी दरम्यानचा काळ संयमी आणि साधक व्यक्तिमत्वाच्या साधनेचा, तपस्येचा कालखंडच आहे. स्वत:चा सूर सापडेपर्यंत थांबलो होतो. असं नम्र आणि निरागसतेने सांगणं हे एखाद्या योग्यालाच जमणार आहे.धामणस्कर हे मुळातच वात्सल्यमूर्ती आणि त्यांच्या ठायी गोरगरीब, अनाथ, निराधार अपंग यांच्याबद्दल विलक्षण कणव आणि जिव्हाळा आहे. ‘हातांशिवाय गात गात तू नियतीबरोबर चालावेस ही तो भगवंताची इच्छा, हे पूर्ण उमगल्यासारखे कृतज्ञ डोळे आस्तिकांची घरे पेटवीत कुठे निघालेत’, असं ते जेव्हा पोलिओने निकामी झालेल्या, पायांना हात करून पेटी वाजवणाऱ्याला ‘हे हाता शरणागता’ या कवितेत विचारतात तेव्हा आपले हातही आपण चाचपडून पाहू लागतो. हे सर्व धामणस्करांपाशी असणारी भाषा आणि शब्दांची ताकद दर्शविते.धामणस्करांच्या दोन्ही संग्रहातील कविता वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येते की, त्यांची कविता अनुभवांच्या अभिव्यक्तींचे एक माध्यम म्हणून आपल्यासमोर येते. त्यांच्या अनुभवांची जिवंत स्पंदने त्यात जाणवतात. धामणस्कर कवितेतून विशाल, व्यापक मानवी जीवनाल थेट भिडत असल्यामुळेच त्यांची कविता वेगवेगळ्या अनुभवांना व्यक्त करताना दिसते. मानवी जीवनाची विविध रूपे पकडण्याचा, त्याची संगती लावण्याचा प्रयत्न करते, मग कधी दृश्य अदृश्य अनुभवांना उलगडते. कधी तर ते निसर्गाचे भव्य दिव्यत्व दाखवतात तर कधी मानवी जीवनातील व्यथा-वेदना, शोषणाने व्यथित होतात. व्यक्तीगत जाणीवा, आकांक्षा, भाव-भावना आणि निसर्गाच्या विराट रुपाच्या पार्श्वभूमीवर पडणारे मानवी जीवनासंबंधीचे प्रश्न एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या भव्यदिव्य रुपाने थक्क होतो. धामणस्करांच्या कवितेचे हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत, त्यामुळेच हा कवी व्यक्तिगत जाणिवा, आशा-आकांक्षा, भाव-भावना यांच्याबरोबर निसर्गाच्या विलोभनीय साक्षात्कारामुळे जीवनात पडणाऱ्या विविध प्रश्नांना आपल्या कवितेत व्यक्त करू पाहतो. कधीकधी आजूबाजूच्या समाजजीवनात व्यक्तीचे स्थान आणि वास्तवाशी नातं, बांधीलकी याचा अपरिहार्यपणे विचार करतो. म्हणूनच धामणस्करांची कविता व्यक्तीकडून, वैयक्तिकतेकडून समाजाच्या घटक असलेल्या मानवी जीवनाकडे प्रवास करताना दिसते. पोएट्री इज लिबरेशन या संकल्पनेचं व्यापक आणि उदात्त स्वरुप म्हणजे धामणस्करांची कविता आणि ही मुक्ती सामाजिक आर्थिक शोषणाहूनही व्यापक आणि उदात्त आहे. त्यात भेदभाव, अनिष्ट पंरपरा, रुढी, रितीरिवाज या सर्वांपासून मुक्ती हाच अर्थ आहे. एकीकडे सामाजिक उत्सव, त्यातले अंतर्विरोध तर दुसरीकडे या वास्तवाचे व्यक्तिगत जीवनावर उठणाऱ्या भावना धामणस्करांच्या कवितेत एकरूप होताना दिसतात आणि ते भौतिक विश्व आणि कवीचे अंतर्मन यात वाचकाला सहजच घेऊन जातात. रुढी आणि परंपरा याचं हस्तांतर दाखवताना ‘मी पुन्हा तरुण ययातीसारखा, माझा मुलगा जख्ख पंरपरेच्या ओझ्याने वाकलेला’ अस संयत भाष्य ते करतात. तर आत्मशोधनात येणारी उदासीनता ‘फार उदास वाटतंय’ या कवितेत मांडताना म्हणतात, ‘सायंतरूच्या फांद्याफांद्यात पाखरे प्राणांतिक कलकलाट करतील, सूर्य बुडतानाचा विझलेला चेहरा मला सतावित राहील आणि हे नतदृष्ट, दुबळे हात परिग्रहपरायण, ज्यांनी ईश्वरत्न नाकारल, सराईपणे... किंवा ‘एकटं वाटलं म्हणून फुलपाखरू फुलाला विचारतं, माझ्या बरोबर येतो, तेव्हा भटक्या समजून प्रत्येक फुल त्याला नकार देतं.’ धामणस्कर म्हणतात, फुलपाखराचं एकटेपण या फुलावरून त्या फुलावर रसिक म्हणून स्थीर होतं.. फुलनपाखरांविषयी अनेक कविता जे सूचित करतात, ते रसिकांचं रसिकत्व देतं.संमेलन होत असतात; पण धामणस्करांसारखा आचार-विचार, नम्रता, निर्व्यसनी, लोकसंग्रह जपणाऱ्या आदर्श ऋषीतुल्य कविचा सहवासच जेव्हा संमेलन होतो, सारं गावच संस्कृतीत परावर्तीत होतं.पु.भा. भावे, शं.ना. नवरे अशा नामवंत साहित्यिकांच्या वास्तव्याने ओळखल्या जाणाऱ्या गावात अर्थात डोंबिवलीत सध्या अनेक साहित्यिक -कवींची वर्दळ आहे. याच वस्तीत राहूनही माणसांपासून दूर, निरिच्छपणे एक ऋषीतुल्य माणूस राहतो, ज्याने आपण जगतोय हे दाखवण्याचा अट्टाहास केला नाही. अस्तित्वाचा बाजार मांडला नाही. फेसबुक नाही. व्हॉटस्अ‍ॅप नाही. आता तर डोळे साथ देत नाही म्हणून वाचनही नाही. माणसांपासून दूर राहून ध्यानस्थपणे चिंतन आणि साधना फक्त कवितेची. हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ कवी द.भा. धामणस्कर अर्थात आबा.