भार्इंदर : मीरा रोड येथील पालिका रुग्णालयात एका महिलेच्या प्रसूतीनंतर तिच्या जीविताला अचानक धोका निर्माण झाला. तिला वाचवण्यासाठी रुग्णालयात अतिदक्षता विभागच नसल्याने उपचारात अडचण आली. अखेर, तिला खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. महापालिकेच्या मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात १२ आॅक्टोबरला नुसरत शाहिद खान (१९) या महिलेची सामान्य प्रसूती झाली. बाळाच्या जन्मानंतर बाळंतिणीची प्रकृती ठीक असतानाच दोन तासांनंतर अचानक रक्तस्राव सुरू झाला. यामुळे नाडीचे ठोके मंदावले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. रक्तस्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. याची माहिती पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते व प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांना दिली. तेही रुग्णालयात दाखल झाले. डॉ. जाधव यांनी स्वत:च्या नियंत्रणाखाली उपचाराला सुरुवात केली. परंतु, रक्तस्राव थांबत नसल्याने त्या बाळंतिणीची प्रकृती वेगाने खालावत होती. त्यामुळे रुग्णालयातीलच रक्तपेढीतून रक्तपुरवठा सुरू झाला. एकीकडे रक्तपुरवठा करण्यात येत असतानाच दुसरीकडे रक्तस्राव होत होता. अतिदक्षता विभागाची सोय नसल्याने आयुक्तांच्या निर्देशानुसार त्या महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)
अतिदक्षता विभाग नसल्याने रुग्णांना धोका
By admin | Updated: October 14, 2016 06:20 IST