जान्हवी मोर्ये, डोंबिवली कल्याण हे ऐतिहासिक आणि साहित्य संस्कृतीची पंढरी असा नावलौकिक असलेली डोंबिवली... दोन्ही शहरांची सांस्कृतिक ओळख वेगवेगळी असली तरी सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सांस्कृतिक विभागच सुरू केलेला नाही. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिकेने सांस्कृतिक विभाग सुरू करून सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्या विभागाचा इथे पत्ताच नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांतील सांस्कृतिक चळवळ कशी वाढीस लागणार, पोषक वातावरण कसे निर्माण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.कल्याणच्या १५० हून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या व्याख्यानमालेचा खर्च महापालिका करते. त्याव्यतिरिक्त महापालिका इतर सांस्कृतिक कार्यक्रमांस हात पुढे करत नाही. कल्याणला अत्रे रंगमंदिर, तर डोंबिवलीला सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर आहे. या दोन नाट्यगृहांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु, या शहरांतील असंख्य सांस्कृतिक संस्थांचा विचार करता ही दोन सभागृहे पुरणारी नाहीत. राज्य नाट्य स्पर्धेसाठी येथील हौशी संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. त्यांना एखादे नाटक बसवायला किंवा एखाद्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी जागा नसते.कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात कॉन्फरन्स हॉल आहे. तो सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी व नाटकांच्या तालमीसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. मात्र, त्याचे भाडे हौशी मंडळींना परवडणारे नाही. सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराच्या वर एक सभागृह आहे. त्यावर, इलेक्शन विभागाच्या मंडळींनी ताबा घेतला आहे. वास्तविक, पाहता हे सभागृह नाटकांच्या तालमी व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीकरिता द्यावे, अशी मागणी केली जाते. त्याचा विचार मनपाकडून होत नाही. डोंबिवलीतील ब्राह्मण सभा सभागृहाकडे महापालिकेची शाळा आहे. त्या ठिकाणी नाट्य कट्टा आहे. त्याची दुरवस्था झाली आहे. तो नव्याने तयार करायला हवा. मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयास लागूनच एक शाळा आहे. तिला प्रशस्त आवार आहे. येथेही तालमींची मुभा दिली, तर नाटके उभी करू शकतात.
कल्याण - डोंबिवली मनपाचे सांस्कृतिक धोरण वाऱ्यावर!
By admin | Updated: July 12, 2016 02:25 IST