भिवंडी : बुजवलेले खड्डे मुसळधार पावसाने वाहून गेल्याने खड्डे पुन्हा पूर्ववत झाल्याने त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मनपाने बोलाविलेल्या विशेष सभेत अंदाजपत्रकात नमूद केल्यानुसार सव्वाचार कोटी रूपये रस्ते दुरूस्तीवर खर्च करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.महानगरपालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी ही रक्कम खर्च करण्याकरीता शेजारील कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर या दोन महानगरपालिकेचा हवाला दिला. गेल्या काही वर्षापासून महासभेत रस्ते बनविण्याचा ठराव घेऊन अंदाज पत्रकातील रक्कम खर्च केल्याचे दाखविण्यात येते. परंतु, शहरांत मुख्य रहदारीचे रस्ते टिकत नाहीत. मागील आयुक्त जीवन सोनवणे यांनी शहरातील मुख्य ३८ रस्ते व नगरसेवकांच्या वार्डातील ९० रस्ते असे एकुण १२८ रस्ते बनविल्याचे सांगीतले. मात्र खड्डे भरण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही. त्याचप्रमाणे शनिवारी महासभेत मांडलेल्या प्रस्तावनेत अंजूरफाटा ते बाग-ए-फिरदोस मशिद आणि कल्याणरोडवर अवजड वाहतूक होत असल्याचा उल्लेख केला आहे. वास्तविक या मार्गावर दोन उड्डाणपूल असताना व काही रस्ता सिमेंटचा असताना भिवंडीकरांचा पैसा बाहेरील वाहनांसाठी खर्च होणार काय? असा सवाल शहरवासीयांनी केला आहे. मंडई ते वंजारपाटीनाका, धामणकरनाका, कोटरगेट-एस.टी., दर्गारोड हे नियमीत रहदारीचे रस्ते बनवावेत. भिवंडीकरांच्या पैशाचा अपव्यय करू नये, अशी तिखट प्रतिक्रीया रिक्षाचालक व खाजगी वाहनधारकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
भिवंडीत सव्वा चार कोटीचे रस्ते?
By admin | Updated: August 18, 2015 00:33 IST