टिटवाळा : करमणूककर थकवल्याने कल्याण तालुक्यातील सहा स्थानिक केबलचालकांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे व करमणूक विभागाने ही कारवाई केली. त्यामुळे अन्य थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यात सहा मुख्य केबलधारक (एमएसओ), तर २२० स्थानिक केबलचालक (एलसीओ) आहेत. करमणूककर थकबाकीदारांविरोधात करमणूक विभागाने कारवाई सुरू केली आहे. लाखो रुपयांचा कर थकवल्याने सहा स्थानिक केबलचालकांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. या केबलचालकांना वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्यांनी कर न भरल्याने ही कारवाई केल्याचे सुरवसे यांनी सांगितले. यापुढे अशा प्रकारची कारवाई सुरू होणार आहे. प्रसंगी थकबाकीदारांवर गुन्हे दाखल केले जातील, असे नायब तहसीलदार अर्चना घोलप यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत तालुक्यातून १५ कोटी रुपयांचा करमणूककर वसूल केल्याची माहिती करमणूककर विभागाचे निरीक्षक महेश भोईर यांनी दिली. (वार्ताहर)
केबलचालकांवर कारवाई
By admin | Updated: March 25, 2017 01:16 IST