ठाणे : दरवर्षी पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडत असल्याने आणि त्यातून अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईचा मुद्दा चर्चेत येत असल्याने ठाणे पालिकेने येत्या महिनाभरात अशा इमारतींची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यादी तयार होताच मे महिन्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्या तोडल्या जाणार आहेत. सध्या ३६ अतिधोकादायक इमारती पालिकेच्या रडारवर आहेत. त्यात महिनाभरात आणखी इमारतींची भर पडण्याची शक्यता आहे. ठामपाच्या सर्वेक्षणानुसार ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात १२५ इमारती धोकादायक, तर ३६ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते. अतिधोकादायक इमारतींची संख्या आधी ५८ होती. त्यातील काही तोडण्यात आल्याने ती ३६ वर आली आहे. येत्या महिनाभरात होणाऱ्या सर्वेक्षणात त्यात भर पडण्याची शक्यता आहे. वर्गीकरणानुसार होणार कारवाईधोकादायक इमारतींच्या वर्गीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात पालिकेने हाती घेतले होते. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच त्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले होते. इमारती धोकादायक ठरवण्याबाबत राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार हे वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार, सी-वन क्षेत्रात अतिधोकादायक इमारती असतील. त्या रिकाम्या करून तत्काळ तोडल्या जातील. त्यातील रहिवाशांना पालिका रहिवास प्रमाणपत्र देईल. भविष्यात त्या इमारतीचा पुनर्विकास झाल्यास त्यांचा अधिकार कायम राहील. सी-टू-ए या संकल्पनेत इमारत धोकादायक असली, तरी ती रिकामी करून तिची डागडुजी करता येईल. सी-टू-बी संकल्पनेतही बाहेरून तसेच आतूनही डागडुजीची संधी रहिवाशांना मिळेल. सी-थ्री संकल्पनेत किरकोळ डागडुजी करून इमारत वापरात ठेवली जाईल. फक्त सी-वन क्षेत्रातील रहिवाशांना इमारत रिकामी करून पालिकेची पर्यायी व्यवस्था स्वीकारावी लागेल. नजरअंदाज महत्त्वाचा : ठाण्यातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. पण, त्यात इमारत धोकादायक ठरली तर घर सोडून जावे लागेल, या भीतीपोटी अनेक सोसायट्यांनी, जुन्या चाळी, इमारतींतील रहिवाशांनी ते केलेले नाही. पालिका सर्व इमारतींचे आॅडिट करू शकणार नसल्याने इमारतीच्या अवस्थेवर नजर टाकून त्या अंदाजावरच धोकादायक-अतिधोकादायक इमारतींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
३६ इमारती मे महिन्यात तोडणार
By admin | Updated: April 2, 2016 03:07 IST