रत्नागिरी : एटीएम, नेट बॅँकिंग व आरटीजीएस हे तीन प्रकार कोअर बॅँकिंगचा भाग आहेत. बॅँकेच्या या सेवा घेणाऱ्यांनी त्याबाबत आवश्यक नियम, गुुप्तता पाळणे आवश्यक आहे. या तीन माध्यमांतून बॅँक खात्यातील पैसे काढले जाऊन ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक होऊ नये म्हणून बॅँकांनी ग्राहकांचे प्रबोधन करायचे आहे. ग्राहकांनीही आपली फसवणूक होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात एटीएममधून हजारो रुपये परस्पर काढून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बॅँकांच्या ग्राहकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काय उपाययोजना केल्या आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता अधीक्षक शिंदे बोलत होते. एटीएम, नेट बॅँकिंग व आरटीजीएस या तीन प्रकारांबाबत रिझर्व बॅँक आॅफ इंडियाकडून बॅँकांना मार्गदर्शक सूचना आहेत. ब्रिटिश स्टॅँडर्सवर आधारित काटेकोर नियम आहेत. याबाबत आपण महिनाभरापूर्वीच बॅँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना केल्या आहेत, असेही ते म्हणाले. ग्राहक आपल्या एटीएम कार्ड, डेबिट कार्डचा पेट्रोल पंप, व्यापारी संस्था, शोरूम्स, मॉल्स यांसारख्या ठिकाणी वापर करतात. त्याठिकाणी खरेदी केलेल्या वस्तूंचे मूल्य वर्ग करण्यासाठी तेथील मशिनवर कार्ड स्वाईप केले जाते. त्यावेळी त्या कार्डशी संबंधित महत्त्वाची माहिती त्या मशिनमध्ये नोंद होते. अशा ठिकाणची नोंद होणारी ही बॅँक ग्राहकांच्या कार्डची माहिती सुरक्षित असते का, हा खरा प्रश्न आहे. याठिकाणची माहिती सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था संबंधित व्यावसायिकाने केलेली नसेल तर ही माहिती हॅकर्सद्वारे हॅक केली जाऊ शकते. जगभरात अशा ‘पॉर्इंट आॅफ सेल’वर व्हायरसद्वारे हल्ला करून तेथील सर्व माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे कार्डधारकांनी कार्ड कुठे स्वाईप करावे, याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित मशिनच्या ठिकाणी कार्यरत लोकांकडूनही कार्ड स्वाईपनंतर नोंद होणारी ही माहिती फ्रॉडर्सना शेअर होऊ शकते. त्याद्वारेही ग्राहकांच्या खात्यातील रक्कम लंपास होऊ शकते. धोकादायक गोष्टींची बॅँक ग्राहकांनी माहिती करून घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)सतर्कता महत्त्वाचीकोणत्याही बॅँकेतून एटीएमधारकांना, डेबिट कार्डधारकांना फोन वा मोबाइलवरून त्यांच्या कार्डचा नंबर, सिक्रेट पीन नंबर विचारला जात नाही. त्यामुळे अशी माहिती विचारण्यासाठी फोन आल्यास त्या फोन करणाऱ्यास कोणतीही माहिती देऊ नये. आपण स्वत: बॅँकेत जाऊन माहिती देणार असल्याचे उत्तर द्यावे. आपल्याला लॉटरी लागल्याचे सांगून कार्डनंबर, पीन नंबर मागणारे फसवणूक करणारेच असतात. त्यांना कधीही हे नंबर्स सांगू नयेत. अशी माहिती फोनवरून घेऊनच अनेक बॅँक ग्राहकांची आजवर फसवणूक झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहावे, असे अधीक्षक शिंदे म्हणाले.
फसवणूक टाळण्यासाठी प्रबोधन गरजेचे : शिंदे
By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST