करमाळा तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. दरम्यान बुधवारी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार बदे, जाधव, मोरे व गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत पद्धतीने हजारो कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये श्रीदेवीचा माळ येथील अथर्व मंगल कार्यालयात लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्याद्वारे काढले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.
करमाळा तालुक्यात अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या देवळाली, मांगी व हिवरवाडी या ग्रामपंचायतमध्ये काठावर बहुमत असल्याने सरपंचपदासाठी येथे मोठी चुरस लागली आहे. देवळाली ग्रामपंचायतीमध्ये अशिष गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सात तर पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या गटाला मिळाल्याने बहुमत मिळावलेल्या गायकवाड गटाने दगाफटका होऊ नये म्हणून आपल्या सर्वच सात सदस्यांना गोवा मुक्कामी नेले आहे. मांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण महिला राखीव झाले असून, रश्मी बागल व दिग्वीजय बागल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलकडे पाच तर विरोधक सुजित बागल यांच्याकडे चार सदस्य आहेत. दोन्ही गटाकडे महिला सदस्य सरपंच पदासाठी इच्छुक असल्याने फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते. हिवरवाडीतही चार विरूध्द तीन असे काठावर बलाबल असल्याने व सरपंच पदाचे आरक्षण महिला राखीव निघाल्याने दोन्ही गटाकडे महिला सदस्य इच्छुक आहेत. येथेही रस्सीखेच सुरू झाली आहे. बागल विरोधी गट सरपंच पद मिळवण्यासाठी राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करू लागला आहे. देवीचामाळ येथे सरपंच पद सर्वसाधारण खुला जाहीर झाल्याने ओढाओढीचे राजकारण सुरू झाले आहे. येथे बागल व पाटील गटाला पाच तर शिंदे व जगताप गटाला चार जागा मिळाल्या होत्या.
साडेत अपक्षाचा रुबाब वाढला
साडे ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी जाहीर झाले आहे. येथे आ.संजयमामा गटाचे दत्ता जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सहा तर विरोधी माजी आ.नारायण पाटील गटाच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या तर एक जागा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोकुळ पाटील यांच्या सूनबाई अनिता शशिकांत पाटील या अपक्षाने पटकाविली होती. योगायोगाने सरपंच पद खुले वर्गासाठी आल्याने अपक्षांना भलतेच महत्व प्राप्त झाले आहे.
असे आहे आरक्षण
अनु.जाती स्त्री : कुंभारगाव, सातोली, खातगाव, तरटगाव, पांगरे. अनु. जाती : सालसे,जातेगाव, बाळेवाडी, सांगवी, केत्तूर, वीट. अनु. जमाती स्त्री : वरकटणे. नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री : खडकी, हिवरे, कोर्टी, पारेवाडी,केम, सरपडोह, अंजनडोह, टाकळी, जिंती, विहाळ, दिवेगव्हाण, वरकुटे, रोसेवाडी, कुंभेज. नागरिकांचा मागासप्रवर्ग : जेऊर, पोंधवडी, वडगाव, लव्हे, हिसरे, कविटगाव, लिंबेवाडी, सोगाव, पोमलवाडी, फिसरे, सावडी, भोसे, कामोणे,कंदर. सर्वसाधारण स्त्री : वंजारवाडी, पुनवर, केडगाव, मांगी, दिलमेश्वर, बोरगाव,घारगाव, पोटेगाव, हिवरवाडी, मिरगव्हाण, अर्जननगर, गौंडरे, सौंदे, राजुरी, मांजरगाव, रिटेवाडी, कात्रज, कावळवाडी, देलवडी, कुगाव, जेऊरवाडी, बिटरगाव-वांगी,दहिगाव,आवाटी,मलवडी,भिलारवाडी,गोयेगाव,चिखलठाण,भगतवाडी,भाळवणी,शेलगाव-वांगी,रावगाव,पांडे. सर्वसाधारण खुला : आळजापुर,आळसुंदे,पाथुर्डी,शेटफळ,गुळसडी,बिटरगाव- ,मोरवड, पोथरे, उमरड, साडे, कोंढेज, वांगी, ढोकरी, कोळगाव, उंदरगाव, झरे, पाडळी, रामवाडी, वडशिवणे, शेलगाव-क, देवीचामाळ, निमगाव, घोटी, पिंपळवाडी, नेरले,वाशिंबे, पोफळज,हिंगणी, देवळाली, निंभोरे, कोेंढारचिंचोली.
फोटो:२७करमाळा-सोडत
करमाळ्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची चिठ्ठी काढताना शाळकरी मुलगा व निवडणूक अधिकारी.
----