शिरीष नाईक - कसई दोडामार्ग - तालुक्यातील राज्य मार्ग व जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे अपघातास निमंत्रण देणे आहे. रस्त्यावरील खड्डे पावसाळी डांबरीकरणाने दुरुस्त करणे आवश्यक होते. मात्र, या खड्ड्यामध्ये माती टाकून रस्ते दुरुस्त केले जात असल्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील दोडामार्ग ते तिलारी हा राज्यमार्ग पूर्णपणे वाहतुकीस खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील मोऱ्याही निकृष्ट झाल्या आहेत, तर काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. या खड्ड्यामध्ये पावसात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. हा रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण मंजूर करण्यात आला, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने निधी कुठे गेला, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तसेच दोडामार्ग ते आयी रस्ता, दोडामार्ग ते पिकुळे, उसप, सासोली ते कोलझर, कळणे ते तळकट या रस्त्याची अवस्थाही बिकट झाली आहे. याही रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोकणवासीयांचे आराध्य दैवत श्री गणेशाचे आगमन २९ आॅगस्टला होणार असल्याने या खड्डेमय रस्त्यांवरून ‘गणपती बाप्पाला कसे आणायचे’ असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. ‘घरी येताना आणि परत जाताना स्वत:ची काळजी घेत सुखरूप रहा’ असे गणपती बाप्पालाही सांगण्याची वेळ यावी, अशी स्थिती रस्त्यांची झाली आहे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीकडे व नवीन डांबरीकरण रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नवीन शाखा डांबरीकरण करताना त्यामध्ये डांबराचा वापर कमी व आॅईल, रॉकेलचा वापर जास्त केला जातो. ५० टक्के रक्कम आपल्याला कशी शिल्लक राहील, याकडेच ठेकेदाराचे जास्त लक्ष असते. त्यामुळे तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत. अशा ठेकेदारांनी केलेले रस्ते खराब निघाल्यास त्यांंची नावे काळ्या यादीत टाकावीत. तरच कामे दर्जेदार होतील. अन्यथा रस्त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. रस्त्यांना गटार नसल्याने गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रस्ते खड्डेमय झाले आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडीमुळेही वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची डागडुजी करताना, गटार, झाडी तोडणे व बांधकाम विभागाने कमिशन न घेणारा अधिकारी ठेवला तरच रस्त्यांची कामे दर्जेदार होणार आहेत.
तिलारी रस्ता धोकादायक
By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST