कुडाळ : शिवसेनेची शक्तिस्थळे असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना एकत्र करून संघटना भक्कम करा, असे आवाहन पालकमंंत्री दीपक केसरकर यांनी केले. आपल्याला जिल्ह्यात ठेकेदार बनायचे नसून, प्रत्येक शिवसैनिकाने लोकसेवक बनून जनतेची सेवा करून जिल्ह्याचा विकास करा, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात केले. कुडाळ-पिंगुळी येथे राज रेसिडेन्सीच्या सभागृहात शिवसेना कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा मंगळवारी आयोजित केला होता. याचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, रत्नागिरीचे माजी जिल्हाप्रमुख उदय बने, सिंधुदुर्ग शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाई गोवेकर, अरविंद भोसले, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, हर्षद गावडे, श्रेया परब, किशोरी पेडणेकर, राजन नाईक, आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा संकल्प केला होता. तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे नेत असून, पक्षप्रमुखांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिलेली जबाबदारी जिल्हा व कोकणच्या विकासानंतरच सार्थ ठरली, असे मी म्हणेन. कोणी काय दिले, दिले नाही याचा विचार न करता नेतृत्त्वावर विश्वास ठेवा आणि संघटनेचे काम करा, असे आवाहन केसरकर यांनी केले. (प्रतिनिधी)
युवा कार्यकर्त्यांना एकत्र करून संघटना भक्कम करा
By admin | Updated: March 3, 2015 21:32 IST