सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ११४.७० च्या सरासरीने ९१७.६ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात कोठेही मोठ्या नुकसानीची घटना घडली नाही. दरम्यान, १४ जुलैपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्यातील वैभववाडी, देवगड, सावंतवाडीसह कणकवली तालुक्यातील नदी, ओहोळांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कुडाळ धुरीनगर येथे महामार्गावर झाड पडून काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच कणकवली तालुक्यातील नरडवे गावातील नामदेव सावंत, गजानन सावंत यांच्या घरांची कौले फुटून नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील मळेगाव येथील श्रीधर जानू मोंडे यांच्या घराची कौले फुटून २५०० रुपयांचे नुकसान, तर श्रीपाद गोविंद जाधव यांच्या गोठ्यावर झाड पडून १८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११४.७०च्या सरासरीने ९१७.६० मि.मी. पाऊस पडला असून, आतापर्यंत ७९५.५० च्या सरासरीने ६३६४ मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग - ५६ (८१५), सावंतवाडी - ११२ (७४७), वेंगुर्ला - १३८.६० (८०८), कुडाळ - ११० (७५०), मालवण - १७७ (१२४२), कणकवली - ११८ (६४९), देवगड - १५५ (८०६), वैभववाडी - ५१ (५४७) एवढा पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला
By admin | Updated: July 12, 2014 00:25 IST