प्रकाश वराडकर - रत्नागिरीएकाने विकास निधी देण्यास हात पुढे करायचा व दुसऱ्याने निधी न स्वीकारता हात मागे घ्यायचे, असा ‘रडीचा डाव’ सध्या रत्नागिरी शहरात सुरू आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री उदय सामंत व भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांच्यातील या शीतयुध्दात त्यांचे पक्षकार्यकर्ते जणू राजकीय सारीपाटावरील प्यादी बनली आहेत. या राजकीय वादात रत्नागिरीच्या विकासाची दैना झाली असून, रत्नागिरीकरांची स्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रत्नागिरी शहर विकासाबाबत ही विचित्र स्थिती आहे. सरकारच्या योजनांमधून रत्नागिरी शहरासाठी येत असलेल्या निधीला या ना त्या कारणाने पालिकेतील महायुतीचे पदाधिकारी पालकमंत्र्यांना ‘श्रेय’ नको म्हणून त्यात कोलदांडा घालत असल्याचे चित्र शहरवासीयांच्या मनात निर्माण झाले आहे. हे चित्र बदलायचे असेल तर महायुतीला आपल्या धोरणात बदल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दशकांपासून रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, बहुतांश पंचायत समित्या, ग्रामपंचायतींवरही शिवसेनेचेच वर्चस्व आहे. मात्र, या स्थितीतही राष्ट्रवादी कॉँग्रेसची गेल्या दशकातील या जिल्ह्यातील घोडदौड वाखाणण्याजोगी आहे. जिल्ह्यात या क्षणालाही शिवसेनेला राष्ट्रवादी कॉँगे्रस हाच मोठा स्पर्धक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत राजकीय वैर निर्माण झाले आहे. रत्नागिरीत तर भाजपनेते बाळ माने व पालकमंत्री उदय सामंत यांच्यात मोठे राजकीय वैर आहे. हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले तरी त्यांच्यातील हे राजकीय वैर लपून राहात नाही, अशी स्थिती आहे. रत्नागिरी पालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम सेनेचे मिलिंद कीर नगराध्यक्ष झाले. त्यांनी रस्ते डांबरीकरणातील अनियमितता दाखवत दोन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले. त्यात आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनचा समावेश प्रामुख्याने होता. शहरातील रस्ते डांबरीकरणाची कामे याच कंपनीमार्फत आजवर होत आली. मात्र, या कंपनीला काळ्या यादीत टाकून महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्याच विरोधात रणशिंग फुंकले. त्याचे पडसाद उमटलेच. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीनेही या २१ कोटींच्या निविदा प्रक्रियेला न्यायालयात स्थगिती घेतली. त्यानंतर चर्चेच्या फेऱ्यांद्वारे सामंत कन्स्ट्रक्शनचे नाव काळ्या यादीतून वगळण्यात आले. तरीही वाद पूर्णपणे मिटलेला नाही. या दोघांच्या भांडणात रत्नागिरीचा विकास मात्र रखडला. गेल्या वर्षभरात अधून-मधून या वादाची झलक रत्नागिरीकरांना पाहायला मिळाली. या वादात रत्नागिरीतील रस्त्यांची कामे रखडली. शहराचा विस्तार होत असताना अनेक विकासकामांना खीळ बसली. विकासाच्या स्तरावर रत्नागिरी शहराचे पर्यायाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच असायला हवे, हे सुजाण नागरिकांनाही कळते. मात्र, या राजकारणात विकासाची कोंडी झाली तर त्याचा जाब निवडणुकीत संबंधितांना द्यावा लागणार हे नक्की आहे. येत्या आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या वादाला पुन्हा ‘गडद रंग’ देण्याचे काम दोन्हीकडून सुरू झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यावेळी रत्नागिरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहरासह या विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना निधी मंजूर करून घेणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामंत यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थातच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला सामंत यांच्या रुपाने तब्बल ५३ वर्षांनी राज्यमंत्रिपद मिळाले आहे. परंतु सामंत हे स्वायत्त संस्था असलेल्या पालिकेला डावलून विकासकामांचा निधी खर्च करू पाहत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे.राजकारणापलिकडची भूमिका घेत दोन्ही पक्षांनी विकासावर लक्ष केंद्रित केले, तर रखडलेली कामे मार्गस्थ होतील. त्यासाठी सामंत व माने यांनी विकासाचा विचार करून एक-एक पाऊल मागे घेणे, हाच उपाय आहे. -निवडणूक हेच वादाचे कारण...अनेक विकासकामांसाठी निधीची घोषणा पालकमंत्री सामंत करतात. त्यावेळी निधी पालिकेच्या बॅँक खात्यात आलाच नाही, येईल तेव्हा पाहू, असे सत्ताधाऱ्यांचे ठरलेले उत्तर असते. राष्ट्रवादीचे व भाजपा कार्यकर्ते यांच्यात वरवर दिसणारी ही लढाई खरेतर पालकमंत्री उदय सामंत व भाजपाचे येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार बाळ माने यांच्यातील आहे. रत्नागिरीत विकासकामे केली तर निवडणुकीसाठी ती आपल्या पथ्यावर पडतील, या उद्देशाने पालकमंत्री विकासकामांचा रेटा निर्माण करीत आहेत आणि विकासकामे झाली तर निवडणुकीत भाजपाला निवडणूक मुद्दे उरणार नाहीत, अशी भीती भाजपाला वाटत असल्यानेच या दोघांमधील राजकारणाचा रडीचा डाव सुरू असल्याचे रत्नागिरीकरच आता खुलेआम बोलत आहेत.
सामंत-मानेंमधील राजकीय ‘रडीचा डाव’
By admin | Updated: July 29, 2014 22:59 IST