संतोष पाटणकर - खारेपाटण , कणकवली तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गावर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या वैद्यकीय अधिकारी (प्रथम वर्ग) व विविध कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. एकच वैद्यकीय अधिकारी २४ तास राबत असून दररोज सुमारे १२५ ते १५० रूग्णांच्या तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे.खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा म्हणून ग्रामस्थांनी सहा महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर देण्यात आले. परंतु काहीकाळ सेवा करून हे डॉक्टर आपल्या गावी निघून गेले ते अद्याप हजर झालेले नाहीत. सध्या खारेपाटणचेच डॉ. राठोड यांची आरोग्य केंद्रात नियुक्ती झाली असून ते सेवा बजावत आहेत. मात्र दिवसाला एकच वैद्यकीय अधिकारी १०० ते १५० रूग्णांची तपासणी करीत आहे. तसेच काम जिकिरीचे असून दुसरा वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे डॉ. राठोड यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. खारेपाटण दशक्रोशीतील चिंचवली, बडगिवे, वारगाव, कुरूंगावणे, शेर्पे, साळीस्ते, वायंगणी, शिडवणे, बेर्ले आदी गावांतील ग्रामस्थांसोबत देवगड, वैभववाडी, राजापूर तालुक्यातील रूग्णही खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहेत. फणसगाव, उंबर्डे, केळवली या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील महिला रूग्णही प्रसुतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल होत असतात. मात्र पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने व सध्या पावसाळ््याचे दिवस असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. आरोग्य विभागाने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्याबरोबरच आदी रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. तसेच सध्या पावसाळा असून साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून खारेपाटणसारख्या पूरग्रस्त भागात एखादी साथ निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जिल्हा आरोग्य विभाग जबाबदार राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. - सध्या वैद्यकीय अधिकारी, मलेरिया पर्यवेक्षक, सफाईगार, कटर- १ अशी पदे रिक्त आहेत.-वैद्यकीय अधिकारी पद गेली तीन महिने रिक्त असल्याने रूग्णांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. -जिल्हा रूग्णालयाने एम.बी.बी.एस डॉक्टर दिल्याचे सांगितले.-येथे सेवेत असलेले तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात काम करणारे डॉ. धामणे यांना सेवेतून मुक्त करण्यात आले.-मलेरिया पर्यवेक्षक हे पद गेली दोन वर्षे रिक्त असल्याने अनेक समस्या उदभवत आहेत.-येथे कार्यरत असलेले एन. एम. माणिक यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. -त्या जागी दुसरे कोणीच मलेरिया पर्यवेक्षक म्हणून पद भरले गेले नाही. -पुरूष सफाईगार- १ पद गेले दोन-तीन महिन्यांपासून रिक्त आहे.-येथील कर्मचाऱ्यांची दुसरीकडे बदली झाल्याकारणाने हे पद रिक्त असल्याचे समजते. मात्र सर्व महिला सफाईगार आहेत. मात्र एकही पुरूष सफाईगार नाही. -अनेक अडचणी निर्माण होत असल्याने सफाईगार हे पद त्वरीत भरण्याची मागणी होत आहे. -खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा महामार्गावर असून येथे नेहमी अपघात झालेले रूग्ण तसेच सर्पदंश झालेले ग्रामीण भागातील रूग्णही येत असतात. -तत्काळसाठीही डॉ. राठोड हेच काम करीत आहेत. दिवस-रात्र ते आपली सेवा बजावत आहेत. एखादा रूग्ण मृत झाला तर शवविच्छेदन करण्यासाठी कटर दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून बोलवावा लागतो.-कटर हे पद रिक्त असून मृताच्या नातेवाईकांना शवविच्छेदन होण्यापूर्वी कटर येईपर्यंत तासनतास वाट पाहत बसावे लागते. -येथे कार्यरत असलेली रूग्ण कल्याण समितीने डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून बाहेर जायचे नाही, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. -वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांना भेटी देणे, अंगणवाडीतील मुलांच्या तपासण्या करणे, परिसरातील शाळांतील मुलांची तपासणी करणे, लसीकरण सत्र पार पाडणे आदी कामेही करावी लागत असल्यामुळे एकच वैद्यकीय अधिकारी वर्गावर याचा ताण पडत आहे.
रूग्णांची होतेय हेळसांड - खारेपाटणमधील स्थिती
By admin | Updated: July 29, 2014 22:59 IST