शिरोडा : कोकणात गणेश चतुर्थी हा मोठा उत्सवाचा सण असतो. या गणेश चतुर्थीला महिन्याहून कमी कालावधी राहिल्याने या उत्सवासाठी वाद्य बनविण्याची घाई जोरात सुरु आहे. ढोलकी तयार करण्यासाठी कारागिरांची सध्या लगबग सुरु झाली आहे.कोकणामध्ये प्रत्येक घरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव काळातील मंगलमय वातावरणात आरत्या, भजने आदी पारंपरिक प्रकार गावागावात जल्लोषात सुरु असतात. गणेशोत्सवासाठी नोकरी धंद्यानिमित्त मुंबईत असलेले हजारो चाकरमानी आवर्जून कोकणातील घरी येतात. या अवधीत चाकरमान्यांचा घरोघरी गजबजाट असतो. गणेशोत्सवाच्या काळात दररोज केल्या जाणाऱ्या आरत्या, भजन, कीर्तन या सर्वांनाच ढोलकी, मृदूंग तसेच तबल्याची गरज असते. त्यामुळे गणेशोत्सव जवळ आला की गावागावात तबला, पखवाज कारागिरांना उसंत नसते. कारागीर दिवसरात्र कामात व्यस्त असतात.शिरोडा बाजारपेठेत गेली वीस वर्षे सांगली जिल्ह्यातील आरवाडी तालुक्यातील खरसुंडी गावातील तबला, पखवाज दुरुस्त करणारे कारागीर जनार्दन लक्ष्मण साळुंखे हे दोन मुलांसह न चुकता येतात. सद्याच्या वाढत्या महागाईचा फटका ढोलकी, पखवाज, तबला व्यवसायालाही बसला आहे. या ढोलक्या, मृदूंगाची किंमतही काही हजारांच्या घरात गेल्याने प्रत्येक जण जुन्या ढोलक्यांनाच नवा साज चढविताना दिसत आहेत.याबाबत साळुंखे म्हणाले की, चामड्याचा दर वाढला की कारागिरांचा दरही वाढत आहे. ढोलकी तयार करणे हे काम कौशल्याचे आहे. त्याला अधिक वेळही लागतो. जुनी ढोलकी पूर्णपणे भरुन तयार करण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये खर्च येतो. तर तबल्याला शाई लावण्यासाठी चारशे ते सहाशे रुपये खर्च येतो. पखवाज तयार करण्यासाठी जवळजवळ दोन हजार रुपये एवढा खर्च येतो. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस राहिल्याने सध्या दिवसभरात काम सुरु असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. तसेच आरवली, रेडी, आजगाव या ठिकाणचे कारागीरही वाद्य बनविण्याच्या व दुरुस्तीच्या कामात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)
वाद्य बनविणाऱ्यांची लगबग
By admin | Updated: July 31, 2014 23:28 IST