रहिम दलाल -रत्नागिरी डायल आऊट कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सहाय्याने रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी घरी बसून त्याचा लाभ मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील मच्छीमार आणि गरोदर महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे मार्गदर्शन आदी कामे जिल्ह्यात रिलायन्स फाऊंडेशनने सुरु केली आहेत. आता त्याची आणखी एक जोड शेतकरी व पशुपालकांना दिली जात आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्या जाणवत असतात. मात्र, त्या समस्या घरी बसूनच सोडण्याच्या दृष्टीने मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करुन कसा करता येईल, त्याकडे रिलायन्स फाऊंडेशनने लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन जिल्हा परिषदेचे सहकार्य घेत आहे. रिलायन्स फाऊंडेशनने मत्स्य खात्याच्या सहाय्याने जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी विविध योजनांची माहिती आणि त्यांना आधुनिक मासेमारीचे ज्ञान देण्यासाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे घेतली. मच्छीमारांना ते समुद्रात जाण्यापूर्वी त्यांना वातावरणाची माहिती, धोक्याचा इशारा देण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशने गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरु केले. त्यासाठी रिलायन्स फाऊंडेशने प्रत्येक नौका मालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन वेळोवेळी एसएमएसच्या द्वारे मच्छीमारांना अॅलर्ट करण्याची भरीव कामगिरी केली. काहीही आर्थिक फायदा न घेता मच्छिमारांना मोफत सेवा देत असतानाच आता शेतकरी, पशु-पालक यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन करण्यास या फाऊंडेशनने जिल्ह्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा आधार घेतला आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २०० शेतकरी व पशुपालकांना त्यांच्या समस्या जाणून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवातही करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील २० पशुपालक व शेतकऱ्यांशी डायल आऊट कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकाच वेळी थेट संपर्क साधून त्यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. त्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष अधिकारी यांनी मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना डॉ. म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी व पशुपालकांसाठीचा पहिला प्रयोग यशस्वीही झाला.रिलायन्स फाऊंडेशनने सुरु केलेला उपक्रम शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे त्यांना घरी बसून समस्यांवर मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकरी व पशुपालकांसाठी प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. - डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
शेतीच्या समस्यांना मोबाईलवर उत्तर
By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST