सातारा : सातारा तालुक्यातील एका गावातील काही अल्पवयीन युवतींची छेड काढल्याच्या कारणावरून अपशिंगे (मि.) येथील दोन युवकांना ग्रामस्थांनी रविवारी सकाळी चांगलीच धुलाई केली. त्यांना बोरगाव पोलिस ठाण्यात आणले. परंतु त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले पालक दुपारी तक्रार न देताच परत गेल्याने गुन्हा दाखल झाला नाही. याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका गावातील काही युवती शिकवणीसाठी रविवारी दुपारी अपशिंगे (मि.) येथे आल्या होत्या. त्या पुन्हा एसटीने घरी जात असताना अपशिंगे (मि.) येथील दोन युवक बसमध्ये चढून या युवतींची छेड काढू लागले. यावेळी त्यांचा अन्य एक मित्र दुचाकीवरून बसच्या मागेच येत होता. आंबेवाडीपर्यंत युवकांचा हा प्रकार सुरूच होता. त्यातील एका युवतीने होत असलेल्या प्रकाराबाबत मोबाईलवरून घरच्यांना माहिती दिली. दरम्यान, स्टॉप आल्याने संबंधित युवती उतरल्यावर ते युवकही उतरले. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून ते खोजेवाडीकडे गेले. यावेळी पालक व गावातील काही युवक स्टॉपवर आले. त्यावेळी छेड काढून पळून जात असणाऱ्या युवकांना पकडून त्यांची बऱ्यापैकी धुलाई करून त्यांना बोरगाव पोलिस ठाण्यास आणले. संबंधित युवती व त्यांचे पालक गावकऱ्यांसह या युवकांविरोधात तक्रार देण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित जमावाचा चांगलाच दंगा सुरू होता. संबंधित युवक हे गेल्या काही महिन्यांपासून संबंधित युवतींना त्रास देत असल्याची माहिती त्यांनी पोलिस व ग्रामस्थांना दिल्याने या युवकांवर कडक कारवाई करावी, अशी उपस्थित ग्रामस्थ व पालकांची मागणी सुरु होती. युवकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या युवतींच्या पालकांनी सकाळपासून दुपारपर्यंत पोलिसांना वेठीस धरून ऐन गुन्हा दाखल करण्याच्या वेळेस सपशेल माघार घेत या युवकांच्या विरोधात फिर्याद न देण्याची भूमिका घेतली. (वार्ताहर) पोलिसांची गोची पालकांच्या भूमिकेमुळे बोरगाव पोलिसांची मात्र चांगलीच गोची झाली. सुमारे चार तास घालवून पोलिसांनी तयार केलेल्या फिर्यादीवर अखेर सही न करताच संबंधित अल्पवयीन युवती, तिचे पालक व ग्रामस्थ निघून गेले. त्यामुळे बोरगाव पोलिसांना संशयित युवक ताब्यात घेऊनही कोणतीच कारवाई करता आली नाही.
एसटीत छेड काढणाऱ्या युवकांची धुलाई
By admin | Updated: August 1, 2016 00:37 IST