सातारा : संगनमताचे ठिकाण, आरोपींनी गाडी लावलेले ठिकाण, हत्यारे लपविलेले ठिकाण हे सर्व उंडाळकरांशी निगडीत आहे. त्यामुळेच उदयसिंह पाटील हा या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्यासह इतर दहा आरोपींनाही दोषी धरावे, अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवादमध्ये शनिवारी करण्यात आली.जिल्हा न्यायालयात सकाळी अकरा वाजता सुनावणीस सुरुवात झाली. जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी युक्तिवादात अनेक मुद्दे मांडले. शिरगावकर म्हणाले, ‘आरोपी सागर परमार, हमीद शेख यांना कऱ्हाड येथील हॉटेल शिवदर्शन येथे संजय पाटील यांच्यावर गोळ्या झाडताना प्रत्यक्षदर्शीने पाहिले आहे. तसेच इतर आरोपींना ओळख परेडमध्ये ओळखले आहे. आरोपींबरोबर त्यांची वैयक्तिक, राजकीय, आर्थिक वादातून दुश्मनी नव्हती, तर मग संजय पाटील यांना मारायचे कारण काय? याचा तपास केल्यानंतर आरोपी केवळ भाडोत्री मारेकरी आहेत. (सुपारी घेऊन खून करणारे) आता हा खून कोणाच्या सांगण्यावरून झाला, हे पाहिले असता बाजार समितीच्या निवडणुकीनंतर संजय पाटील यांनी भिंतीला अडकविलेले घड्याळ काढून दरवाजाजवळ फेकून दिले. त्यानंतर घड्याळावर पाय दिला आणि उंडाळकरांना शिवीगाळ केली. त्याचे कारण उंडाळकरांनी मोक्कामध्ये अडकवल्याचा संजय पाटील यांच्या मनात राग होता. त्या भावना व राग व्यक्त करण्यासाठी घड्याळावर पाय दिला. याचा बदला घेण्यासाठी, तसेच भविष्यात राजकीय विरोध होऊ शकतो, हे पाहून सुपारी देऊन संजय पाटील यांचा खून करण्यात आला.’अॅड. शिरगावकर पुढे म्हणाले, ‘घटनेनंतर या प्रकरणामध्ये कोण-कोण सहभागी आहे, हे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. उदयसिंहचे नाव निष्पन्न होत होते. हे तपासी अधिकारी संभाजी पाटील यांना माहिती होते. मात्र, उदयसिंहला अटक का केली नाही. केवळ चारच आरोपींना अटक केली. घटनेनंतर आरोपी सागर परमार आणि हमीद शेखने लपवून ठेवलेले हत्यार व ठिकाण दाखविले. या दोघांना पोलिसांनी बुरखा घालून गाडीतून ठिकाण दाखविण्यासाठी नेले. रयत कारखान्याच्या गेटपर्यंत गेल्यानंतर त्यांनी गाडी थांबविण्यास सांगितली. रयत कारखान्याच्या शेडमध्ये मोटारसायकल लपविलेले ठिकाण आरोपींनी दाखविले. तसेच कारखान्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर लपविलेली नऊ एमएमची दोन गावठी पिस्तुले काढून दिली. या आरोपींनी रयत कारखानाच का दाखविला, याचा अर्थ उदयसिंह पाटील कारखान्याचा संचालक होता.’ या संस्थांवर उंडाळकरांचे कंट्रोल असल्यामुळे तेथे कोणी जाऊ शकत नाही. हा मुद्दाही सरकारी वकिलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिला.‘बाजार समिती निवडणूक प्रक्रियामध्ये मी नव्हतो,’ असे उदयसिंहचे म्हणणे आहे. मात्र सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) मध्ये उदयसिंहचे टॉवर लोकेशन वडगाव हवेली बुथ दाखवत आहे. तसेच या खटल्यातील आरोपी संभाजी खाशाबा पाटील आणि बाबा मोरे हे मला भेटत होते. मात्र इतर आरोपींशी माझा काही संबंध नव्हता, असे उदयसिंहचे म्हणणे आहे. परंतु हे दोन्ही आरोपी संगनमतामध्ये (कटात) सहभागी आहेत. तसेच संभाजी पाटील वापरत असलेले मोबाइलचे दोन नंबर उदयसिंह पाटीलच्या सीडीआर रिपोर्टमध्ये दिसतात. संजय पाटील यांचा ३ वाजून ३० मिनिटांनी खून झाला. त्यानंतर ३ वाजून ३८ मिनिटांनी संभाजी पाटीलने उदयसिंहला फोन केल्याचे सीडीआर रिपोर्टमध्ये स्पष्ट होत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)
उदयसिंह पाटील कटाचा मुख्य सूत्रधार
By admin | Updated: September 21, 2014 00:30 IST